मुंबई: राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) सध्या मोठ्या राजकीय संकटातून जात आहेत. त्यांच्याच पक्षाच्या आमदारांनी आधी बंड केलं. नंतर पक्षावर आणि पक्षाच्या चिन्हावर दावा सांगितला. त्यामुळे पक्षाचं नाव आणि चिन्हंही गोठवलं गेलं. उद्धव ठाकरे यांच्या राजकीय आयुष्यातील हा सर्वात कठिण प्रसंग आहे. अशावेळी उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीच्या (mahavikas aghadi) नेत्यांकडून धीर दिला जात असतानाच काश्मीरमधील नेते, नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला (farooq abdullah) यांनी उद्धव ठाकरे यांना धीर दिला आहे. वडिलांसारखं लढण्याचा सल्ला फारुख अब्दुल्ला यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे. निमित्त होतं राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या अमृत महोत्सवी वर्षाचे.
छगन भुजबळ यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्ताने मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात त्यांच्या सत्काराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि नॅशनल कॉन्फरन्सचे फारुख अब्दुल्ला उपस्थित होते. या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे यांनीही हजेरी लावली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि फारुख अब्दुल्ला यांची भेट झाली.
अब्दुल्ला यांनी उद्धव ठाकरे यांची विचारपूस केली. तसेच अजिबात घाबरू नकोस. वडिलांसारखं लढ, असं अब्दुल्ला म्हणाले. त्यावर मी ही लढाई अजिबात सोडणार नाही, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. उद्धव ठाकरे यांनी स्वत: भाषणात हे स्पष्ट केलं.
शिवसेनेने अशी अनेक वादळे अंगावर घेतली आहे. आपल्याकडे वादळ निर्माण करणारे सोबत आहेत. वादळ असो, पाऊस असो न डगमगता उभे राहणारे आपल्यासोबत आहेत. त्यामुळे कसली भीती नाही, असं ते म्हणाले.
हल्ली प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टात जाऊन लढावे लागत आहे. मैदान हवं, कोर्टात जा. अरे हिंमत असेल तर मैदानात याना तुम्ही. माझी तर तयारी आहे. मी मैदानात उतरलो आहे. आम्हाला मैदान कसं मिळणार नाही हे पाहण्यापेक्षा दोघांनी मैदानात या, अन् होऊन जाऊ द्या जे व्हायचे ते, असं आव्हानच उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला दिलं.
अडीच तीन वर्षापूर्वी आपण एक नवीन समीकरण जन्माला घातलं. हे समीकरण आपण यशस्वीपणे चालवून दाखवलं. ते बघितल्यावर पोटात गुब्बारा येणं स्वाभाविक आहे. प्रत्येक गोष्टीत खालच्या पातळीवर जात आहेत. राजकारणाचा विचार करण्यापेक्षा विचाराणे राजकारण करणारे कमी आहेत, असा टोला त्यांनी यावेळी लगावला.