महाविकास आघाडीत असलेल्या उद्धव ठाकरे गटाने पुन्हा एकदा हिंदुत्वाची लाईन पकडली आहे. आज उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी बांग्लादेशात हिंदुंवर होणारे अत्याचार आणि दादर येथील 80 वर्ष जुन मंदिर पाडण्यासाठी आलेली नोटीस हा मुद्दा लावून धरला. येणाऱ्या काळात उद्धव ठाकरे गट हिंदुत्वाचा मुद्दा लावून धरणार असल्याच आजच्या पत्रकार परिषदेतून स्पष्ट झालय. कारण नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या गटाला मोठा फटका बसला. त्यांचे फक्त 20 आमदार निवडून आले. हिंदुत्वाचा मुद्दा सोडल्याने अशी परिस्थिती ओढवल्याच पक्षांतर्गत एक मत बनलं आहे. त्यामुळे पुन्हा हिंदुत्वाच्या वाटेवरुन चालणार असल्याचे संकेत उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.
“तुमच्या हिंदुत्वाची व्याख्या काय आहे? इलेक्शन पुरतं त्यांचं हिंदुत्व बाकी आहे. हिंदू म्हणजे नुसती मतं नाही. त्यांना भावना आहे. वन नेशन वन इलेक्शन ठिक आहे. पण त्यांचं हिंदुत्व केवळ हिंदुंच्या मतासाठी होतं का” असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला. “यांचं हिंदुत्व मतांपुरतं आहे. हिंदुंची मते हवी. त्यांना भयभीत करायचं. घाबरवायचं आणि सत्तेत आल्यावर स्वत मंदिरं पाडायचं. मंदिरं कुठे सेफ आहेत. बांगलादेशात नाही आणि मुंबईतही नाही. एक है तो सेफ है म्हणता मग मंदिर कुठे सेफ आहेत” असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला.
राक्षसी बहुमत किती पाहिजे?
पत्रकारांनी यावेळी उद्धव ठाकरेंना मंत्रिमंडळ विस्ताराला होत असलेल्या विलंबाबद्दल विचारलं. त्यावर ते म्हणाले की, “काल बातम्या पाहिल्या. याचे खासदार फोडणार, त्याचे खासदार फोडणार. यांचं हिंदुत्व झूठ आहे. राक्षसी बहुमत किती पाहिजे. बहुमत मिळाल्यावर त्यांना विस्तार करता येत नाही. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर त्यांनी बोलावं. आज बांगलादेशातील हिंदुंवर ही परिस्थिती असेल तर इतरांचं काय. बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत आहे, त्यावर मोदींनी बोलाव”
अजित पवार-शरद पवार भेटीवर भूमिका काय?
काल शरद पवार यांचा वाढदिवस होता. त्या निमित्ताने अजित पवार यांनी शरद पवारांची भेट घेतली. आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार अशी चर्चा सुरु झाली आहे. त्या संबंधी उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारताच त्यांनी “मी दुसऱ्या कुठल्याही विषयावर बोलणार नाही. मला बांग्लादेशातील हिंदुंवर होणाऱ्या अत्याचारावर नरेंद्र मोदी, हिंदुस्थान सरकार काय भूमिका घेणार ते स्पष्ट करावं”