मुंबई- गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या एकनाथ शिंदे (Ekanath Shinde) आणि विरोधकांचा डाव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी थेट पलटवला आहे. पदाचा हव्यास कधीच नव्हता असे सांगत, मुख्यमंत्रीपदाचा (CM) राजीनामा लिहून ठेवतो, समोर या आणि राजीनामा घेऊन राज्यपालांकडे जा, असे थेट आवाहन त्यांनी बंडखोर आमदारांना केलं आहे. इतकंच नाही तर शिवसैनिकांनाही त्यांनी आवाहन केलं आहे. मी तुम्हाला या पदावर नको असेन तर मला प्रत्यक्ष भेटून सांगा, आपण शिवसेना पक्षप्रमुखपद सोडण्यासही तयार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. हिंदुत्व, बाळासाहेबांची शिवसेना, भेटी नाकारल्या, या सगळ्या बंडखोर आमदारांच्या प्रश्नांना त्यांनी उत्तर दिली आहेत. तसेच शिवसेनेच्याच आमदारांना त्यांनी भावनिक सादही घातलेली दिसते आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादीने, त्यांच्या आमदारांनी आपल्यावर भरवसा ठेवला. पण माझीच लोकं म्हणत असतील की मी मुख्यमंत्री नको. तर ते धक्कादायक आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले. मी त्यांना आपले मानतो, पण ते मला आपले मानतात का, माहीत नाही, अशीही भावनिक साद उद्धव यांनी घातली आहे. आपल्यासमोर येऊन का बोलले नाहीत. तुम्ही मुख्यमंत्री म्हणून नालायक आहे. तुम्ही नकोत. हे आपल्याला एकाही आमदाराने सांगितलं नाही. आजही तुम्ही मुख्यमंत्रीपद नको तर मी मुख्यमंत्रीपद घेणार नाही. आजच मातोश्रीवर मुक्काम हलवणार असल्याचे त्यांनी सांगितले. सत्तेचा मोह नाही. तुम्ही हे कशाला करत आहात. त्यामुळे कुणाचं नुकसान करायचं आहे, असा सवाल त्यांनी एकनाथ शिंदे आणि बंडखोरांना विचारला आहे.
शिवसेना आणि हिंदुत्व घट्ट आहे. कोणी एकमेकांपासून तोडू शकत नाही. त्यामुळे आदित्य, एकनाथ शिंदे, आमदार खासदार अयोध्येला जाऊन आले. हिंदुत्वाबद्दल विधानसभेत बोलणारे आपण कदाचित पहिले मुख्यमंत्री असू असेही त्यांनी सांगितले. आता बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना राहिली नाही असं काही लोक भासवत आहेत. मी काय नेमकं वेगळं केलं की बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही. बाळासाहेब गेल्यानंतर 2014ची एकाकी लढलो. तेव्हाही तेच होतो आताही तसेच आहे. तेव्हा 63 आमदार आले. आता मंत्रिमंडळात तेच मंत्री आहेत. मधल्या काळानंतर जे काही मिळालं ते बाळासाहेबांच्या शिवसेनेने दिलं हे लक्षात ठेवा, याची जाणीवही त्यांनी करुन दिली.
काही दिवसांपूर्वी हे सत्य होतं. कारण आपली शस्त्रक्रिया झाली होती. अनुभव सांगणार नाही. पण दोन ते तीन महिने भेटू शकत नव्हतो. हा मुद्दा बरोबर आहे. त्यानंतर आता भेटायला सुरुवात केली आहे. भेटत नव्हतो पण कामं थांबली नव्हती, याचीही आठवण त्यांनी करुन दिली.
शिवसेना प्रमुखांना दिलेलं वचन पूर्ण करणारचं म्हणून रणांगणात उतरल्याचे त्यांनी सांगितले. आपल्याला नाईलाजाने काही निर्णय घ्यावे लागेल. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जावं लागलं. तीन पक्षाची बैठक झाली. त्यात ठरलं. त्यानंतर पवारांनी जबाबदारी घ्या, असे सांगितल्याने ठिक आहे, घेतो असे सांगितल्याचे उद्धव यांनी सांगितले. पवारांनी विश्वास टाकला, सोनिया गांधींनी विश्वास टाकला. त्यांनी सहाकार्य केलं. प्रशासनानेही सहाकार्य केले, असेही उद्धव म्हणाले.
माझ्यासमोर येऊन बोला. शिवसेनेशी गद्दारी करणार नाही, असे उद्धव म्हणाले. ही शिवसेना आमची आहे ती नाही. कशाला करत आहात. त्यामुळे नुकसान कुणाचं होत आहे, हे लक्षात घ्या, असेही त्यांनी बंडखोरांना सांगितले आहे. कुऱ्हाडीचा दांडा हा गोतास काळ असे वागू नका, असे ते म्हणाले. म्हणजे आपली राजकारणातील जन्मदात्री शिवसेना आहे. तिचचं लाकूड वापरून तिच्यावर घाव घालू नका. असे ते म्हणाले.
मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री होत असेल तर मला आनंदाने मान्य आहे. असे उद्धव म्हणाले. त्याही पलिकडे जाऊन केवळ मी मुख्यमंत्री नको दुसरा कोणी चालेल तर तेही मला मान्य आहे. मला समोर येऊन सांगा. मी खूर्ची अडवून ठेवलीय ना. तुम्ही या समोरून सांगा. फोनवरून सांगा. हा कुठेही अगतिकपणा नाही. लाचारीचा प्रसंग नाही. मजबुरी अजिबात नाही. आजपर्यंत असे अनेक आव्हाने आपण बिनसत्तेचे पेलले. हे काय मोठं आव्हान आहे. काय होईल जास्तीत जास्त. परत लढू. असे सांगत त्यांनी सत्ता मोठी नसल्याचा संदेशच दिला आहे.