मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालिसाचा (Hanuman Chalisa) मुद्दा चांगलाच गाजतोय. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर जात हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा दिलाय. उद्या सकाळी 9 वाजता मातोश्रीवर (Matoshri) जात हनुमान चालिसा पठण करणार, असं रवी राणा म्हणालेत. राणा दाम्पत्याच्या इशाऱ्यानंतर इकडे मातोश्रीवर सकाळपासूनच शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. शेकडो शिवसैनिक राणा दाम्पत्याविरोधात सकाळपासूनच जोरदार घोषणाबाजी करत होते. त्यानंतर दुपारी साडे चार वाजता मुख्यमंत्री स्वत: मातोश्रीवर दाखल झाले. त्यांनी मातोश्रीवर जमा झालेल्या शिवसैनिकांचे हात जोडून आणि हात उंचावून आभार मानले.
राणा दाम्पत्याच्या इशाऱ्यानंतर मोठ्या संख्येनं शिवसैनिक मातोश्रीवर दाखल झाले. खासदार विनायक राऊत, खासदार अनिल देसाई, युवा सेना सचिव वरुण सरदेसाई हे देखील मातोश्रीसमोर शिवसैनिकांसोबत रस्त्यावर बसून होते. शिवसैनिकांनी महाप्रसादाची तयारी केली आहे, राणा दाम्पत्याने येऊन मातोश्रीसमोर हनुमान चालिसाचं पठण करावं आणि शिवसैनिकांचा प्रसाद घेऊन जावं, असं प्रतिआव्हान विनायक राऊत आणि वरुण सरदेसाई यांनी राणा दाम्पत्याला दिलं. त्याचबरोबर ही केवळ स्टंटबाजी आहे, त्यांचा बोलवता धनी वेगळा असल्याचं सांगत विनायक राऊत यांनी भाजपवरही जोरदार निशाणा साधला.
सकाळपासून मातोश्रीसमोर बसलेल्या शिवसैनिकांचे आभार मानण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वर्षा निवासस्थानावरुन दुपारी साडे चार वाजता मातोश्रीवर दाखल झाले. ते मातोश्रीच्या गेटवर गाडीतून उतरले. तिथे उपस्थित असलेल्या शिवसैनिकांना हाच उंचावून आणि नमस्कार करून मुख्यमंत्र्यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.
रवी राणा आणि नवनीत राणा यांनी उद्या सकाळी 9 वाजता मातोश्रीवर जाणार आणि हनुमान चालिसा पठण करणारच असं आव्हान दिलं आहे. त्या पार्श्वभूमीवर आता उद्या सकाळी 8 वाजता मातोश्रीवर जमण्याचे आदेश शिवसैनिकांना देण्यात आले आहेत. मुंबईतील सर्व विभागप्रमुखांना तशा सूचना देण्यात आल्याची माहितीही सूत्रांकडून मिळतेय.
आम्ही कोणत्याही परिस्थितीत मातोश्रीसमोर हनुमान चालिसा वाचणार आहोत. आम्ही उद्या सकाळी 9 वाजता मातोश्रीवर जाणार. कायदा सुव्यवस्थेचं पालन करणार, पोलिसांना सहकार्य करणार. बाळासाहेब ठाकरे असते तर एकदा नाही शंभरवेळा हनुमान चालिसा वाचण्याची परवानगी दिली असती. मी दिवाळी पूर्वी शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलं. मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न केलं. मात्र, मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची दिवाळी काळी केली. मला मातोश्रीवर जाताना अटक केली, तुरुंगात टाकलं. मला आजही अमरावतीत बंदी करण्यात येणार होतं, तसे पोलिसांना आदेश होते. सरकार तुमचं आहे. तुम्ही आम्हाला आत टाकाल. पण जय श्रीराम आणि बजरंग बलीचं नाव घेण्यापासून आम्हाला कोणी रोखू शकणार नाही, असं आव्हान रवी राणा यांनी शिवसेनेला दिलंय.
इतर बातम्या :