नंदुरबार | 17 मार्च 2024 : लोकसभा निवडणुकीच्या घोषणेच्या दुसऱ्याच दिवशी शिवसेना उबाठाचे नेते उद्धव ठाकरे यांना धक्का बसणार आहे. ज्या व्यक्तीसाठी उद्धव ठाकरे यांनी पक्षातील बड्या नेत्यांची नाराजी ओढवून घेतली, त्याला विधान परिषद आमदाराकीचे बक्षीस दिले, तो आज सोडून चालला आहे. या आमदारास विधान परिषदेवर निवडून आणण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी जीवाचे रान केले होते. परंतु तो आता उद्धव ठाकरे यांची साथ सोडत आहे. यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का मानला जात आहे. ठाकरे गटाचे नेते आमदार आमश्या पाडवी आज शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यासाठी ते कार्यकर्त्यांना घेऊन मुंबईची दिशांनी निघाले आहेत.
नंदुरबार जिल्ह्यातून आमश्या पाडवी साथ सोडत असल्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार आहे. विश्वासनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ते मुख्यमंत्रीच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर शिंदे गटात जाणार आहे. दरम्यान, यासंदर्भात आमश्या पाडवी यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी आपण कुठेही जाणार नसल्याच्या सांगितले आहे.
शिवसेना उबाठाकडे एकही आदिवाशी चेहरा नव्हता. यामुळे उद्धव ठाकरे यांनी नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागातील आमश्या पाडवी यांना संधी दिली. त्यांनी नंदुरबार जिल्ह्यात शिवसेना पक्ष रुजवला. त्यामुळे त्याचे बक्षीस म्हणून 2022 मध्ये झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी त्यांना उमेदवारी दिली होती. अनेक बड्या नेत्यांना डावूलन त्यांना नंबर लावल्याने पक्षात नाराजी होती.
अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातून आमश्या पाडवी यांनी दोन वेळा निवडणूक लढवली. 2014 आणि 2019 मध्ये त्यांनी आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. परंतु निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यामुळे त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांना विधान परिषदेत संधी दिली.
नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून उमेदवार जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय हालचालींना अधिक वेग मिळालेला आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते चंद्रकांत रघुवंशी आणि काँग्रेसचे आमदार के सी पाडवी यांनी एकमेकांचे गुप्त भेट झाली. माजी आदिवासी विकास मंत्री आमदार के सी पाडवी यांनी चंद्रकांत रघुवंशी यांची नंदुरबार येथील आमदार कार्यालयामध्ये भेट घेतली. या भेटीमागे नेमकं काय गुपित दडलं आहे.? याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. भाजपकडून डॉ. हिना गावित यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आलेली आहे. विद्यमान खासदार असलेल्या हिना गावित यांची गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये आमदार के. सी. पाडवी यांच्या विरोधात लढत झाली होती.