‘…असं केलं, तर उद्धव ठाकरेंना विरोधी पक्ष नेतेपद मिळेल’, भाजप नेत्याचा खोचक सल्ला

| Updated on: Nov 26, 2024 | 10:57 AM

"विसातले शून्य जाईल आणि दोनच शिल्लक राहतील बाप आणि लेक. ती वाईट परिस्थिती येऊ नये म्हणून उद्धवजी घराच्या बाहेर पडा. संघटनेकडे बघा, पैसे थोडे खर्च करा तर उद्धव ठाकरे सेना शिल्लक राहील" असं भाजप नेत्याने खोचक सल्ला दिला आहे.

...असं केलं, तर उद्धव ठाकरेंना विरोधी पक्ष नेतेपद मिळेल, भाजप नेत्याचा खोचक सल्ला
उद्धव ठाकरे
Follow us on

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने महायुतीला भरघोस मताधिक्क्याने निवडून दिलय. त्याचवेळी महाविकास आघाडीला सपशेल नाकारलय. महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळवण्याइतक्याही जागा दिलेल्या नाहीत. महाविकास आघाडीने एकूण मिळून 46 जागा जिंकल्या आहेत. यात उद्धव ठाकरे गटाने सर्वात जास्त 20, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने 16 आणि शरद पवार गटाने 10 जागा जिंकल्या आहेत. महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे गटाच्या थोड्या जास्त जागा असल्याने ते विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी आग्रही आहेत. पण कायद्याच्या जाणकरांनी दिलेल्या माहितीनुसार महाविकास आघाडीला हे विरोधी पक्षनेतेपद मिळू शकत नाही.

आता भाजपचे माजी आमदार आणि कोकणातील नेते प्रमोद जठार यांनी विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी उद्धव ठाकरेंना उपरोधिक सल्ला दिला आहे. “उद्धव ठाकरेंना आता जर विरोधी पक्ष नेते करायचं असेल, तर उरली सूरलेली उबाठा त्यांनी शरदचंद्रजी पवार किंवा काँग्रेसमध्ये विलीन करावी . पक्ष विलीन करून विरोधी पक्षनेते पद घ्यावं” असं प्रमोद जठार यांनी म्हटलं आहे. “मुख्यमंत्री पदावरून महायुतीमध्ये कुठलाही वाद नाही. महायुतीचे न्यायाधीश हे दिल्लीत बसतात” असं प्रमोद जठार म्हणाले.

‘पैसे थोडे खर्च करा’

“दिल्लीतले न्यायाधीश जे निर्णय देतील ते महायुतीला मान्य असेल. न्यायाधीश योग्य प्रकारे जजमेंट करतील. लवकरच महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळेल” असा विश्वास प्रमोद जठार यांनी व्यक्त केला. “जनतेने भरभरून दिलेले 60 आमदार सांभाळता आले नाहीत, त्यांच्या पदरी शेवटी 20 आले. 20 आमदार सुद्धा सांभाळून ठेवा, विसातले शून्य जाईल आणि दोनच शिल्लक राहतील बाप आणि लेक. ती वाईट परिस्थिती येऊ नये म्हणून उद्धवजी घराच्या बाहेर पडा. संघटनेकडे बघा, पैसे थोडे खर्च करा तर उद्धव ठाकरे सेना शिल्लक राहील” असा खोचक सल्ला प्रमोद जठार यांनी दिला.

‘उद्धव ठाकरेंनी लुगडं गमावलं’

“ज्यांचे आमदार जास्ती त्यांचा मुख्यमंत्री हे शरद पवारांनी ज्या दिवशी जाहीर केलं त्या दिवसापासून महाविकास आघाडीचा रनिंग रेट खाली उतरायला सुरुवात झाली. जेवढं बाळासाहेबांनी कमावलं होतं ते शरद पवार आणि काँग्रेसच्या नादाला लागून उद्धव ठाकरेंनी गमावलं. अगदीच उद्धव ठाकरेंनी लुगडं गमावलं तिथपर्यंत महाविकास आघाडीला मतदारांनी नेऊन ठेवलं” अशी टीका प्रमोद जठार यांनी केली.