ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत प्रसारीत झालीय. खासदार संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली आहे. उद्धव ठाकरे यांनी या मुलाखतीत सद्याची राजकीय परिस्थिती, लोकसभा निवडणूक 2024, भाजपा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर भाष्य केलय. संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना काही प्रश्न विचारलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 वर्ष सत्तेत आहेत, त्यांच्या कार्याचा डंका वाजवला जातोय, त्यांची पाच कामं आठवतायत क? त्यावर हो, असं म्हणून उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं. ‘पक्ष फोडले, कुटुंब फोडली, भ्रष्टाचाऱ्यांना स्थान दिलं, निवडणूक रोखे जमवले आणि जनतेला फसवलं’ असं उत्तर त्यांनी दिलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनच युद्ध थांबवलं, हे तुम्ही मानायला तयार नाही का? यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘वॉर रुकवादी, वाट लगा दी पापा’ “युद्ध थांबवलं असेल, पण मणिपूर एकवर्षापासून का धुमसतय? ते का नाही थांबवलं?” असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. “मणिपूर अजून अशांत का आहे? काल परवा मतदानाच्या दिवशी तिथे हिंसाचार झाला. ज्या पद्धतीने महिलांची धिंड काढली, तिथले मुख्यमंत्री म्हणाले, असे बरेच प्रकार झालेत. स्वत: गृहमंत्री जाऊन आले त्यांना माहित नव्हतं का?” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
‘मतं मागताना मला लाज वाटते’
“जर ते व्हिडिओ बाहेर आले नसते, तर जगाला कळलच नसतं. दडपशाही सुरु आहे. बातम्याच बाहेर येऊ देत नाहीयत. अत्याचार आज सुद्धा सुरु आहे. आज ते आपल्यापर्यंत पोहोचतही नाहीय. मणिपूर अजूनही अशांत आहे, त्याबद्दल कोणाच्या मनात संवेदना दिसत नाहीय. मतं मागताना मला लाज वाटते, तिथल्या महिलांवर, लोकांवर काय परिस्थिती उदभवली असेल, त्याबद्दल कोणाच्या मनात संवेदना नाहीय” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
‘तुम्हाला माझ्या दारासमोर भिकेचा कटोरा घेऊन उभं रहाव लागेल’
हा 140 कोटीचा मोठा देश आहे. या देशामध्ये 85 कोटी लोकांना मोदी पाच किलो फुकट धान्य पुरवतायत, तरीही ते म्हणतायत की, देशाची आर्थिक स्थिती मी सुधारली. या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले की, “तुम्हाला माझ्यावर अवलंबून रहावं लागलं, म्हणजे तुम्ही माझे गुलाम झालात. याचाच अर्थ त्यांना देशाला गुलाम बनवायचं आहे. मी खायला दिलं, तरच त्यांच पोट भरेल, नाहीतर पोट भरण्याच साधन ठेवणार नाही. उद्योगधंदे पळवून नेणार. रोजच्या खाण्यापिण्यासाठी तुम्हाला माझ्या दारासमोर भिकेचा कटोरा घेऊन उभं रहाव लागेल. मग, तुम्ही मला नाकारु शकत नाही, हीच भीती आहे” असं उद्धव ठाकरे म्हणाले.