भाजपचं हिंदुत्व तपासण्याची वेळ आलीय; उद्धव ठाकरे यांनी डिवचलं

| Updated on: Jul 27, 2023 | 7:44 AM

बाबरी पाडल्याची जबाबदारी घ्यायला तुम्ही तयार नव्हता. राम मंदिराचं श्रेय तुम्ही कसं घेता? तुम्ही हिंदुत्वासाठी काय केलं? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

भाजपचं हिंदुत्व तपासण्याची वेळ आलीय; उद्धव ठाकरे यांनी डिवचलं
uddhav thackeray
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई | 27 जुलै 2023 : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपला डिवचलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्वाचं वेगळं स्वप्न होतं. हिंदुत्वाचं वेड होतं. हिंदुत्वाच्या एका विचारधारेमुळे त्यांनी समान नागरी कायदा आणि 370 कलम आदी गोष्टींना पाठिंबा दिला, असं सांगतानाच आता भाजपचं हिंदुत्व तपासण्याची वेळ आली आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपला डिवचलं आहे.

उद्धव ठाकरे यांची संजय राऊत यांनी दैनिक सामनासाठी मुलाखत घेतली आहे. त्यांच्या मुलाखतीचा आज दुसरा भाग आहे. या मुलाखतीत त्यांनी हिंदुत्वापासून विविध मुद्द्यावर भाष्य केलं. उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदुत्व सोडल्याचा आरोप होतोय. त्यावरही त्यांनी उत्तर दिलं आहे. एक विधान, एक निशाण आणि एक प्रधान ही त्यांची घोषणा होती. आता त्यात त्यांनी जोडलंय एकच पक्ष. ते मी आणि देशातील जनता कधीच मान्य करू शकत नाही. एक देश मान्य, एक निशाण मान्य, पण एक प्रधान म्हटला तरी तो जनतेने निवडून दिलेला पाहिजे. पण तुम्ही एक पक्षाची टिमकी वाजवत असाल तर कदापी खपवून घेणार नाही, असा इशाराच उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

हे सुद्धा वाचा

वाट्टेल ते खपवून घेणार नाही

भाजप हिंदुत्वाच्या नावाखाली वाट्टेल ते खपवत आहे. ते देशातील जनता कदापी खपवून घेणार नाही. ताक सुद्धा फुंकून पिण्याची वेळ येते. तसेच भाजपचं हिंदुत्व तपासण्याची वेळ आली आहे. एखाद्याला भ्रष्टाचारी म्हणून हिणवायचं. त्याला आयुष्यातून उठवायचं आणि त्यांच्या मांडिला मांडी लावून बसायचं हे हिंदुत्व नाहीये, असा हल्लाच उद्धव ठाकरे यांनी चढवला.

हिंदुत्व म्हणजे धोतर आहे काय?

उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी हिंदुत्व सोडल्याचा आरोप होतोय. त्यालाही त्यांनी उत्तर दिलं. मी हिंदुत्व सोडलं म्हणजे नेमकं काय सोडलंय. हिंदुत्व सोडायला ते काय धोतर आहे काय? पाहिजे तेव्हा सोयीप्रमाणे नेसलं आणि सोडलं असं होत नाही. आमचं असं बेगडी हिंदुत्व नाहीये, असं सांगतानाच काश्मीरमध्ये आज देखील हिंदू असुरक्षित आहे. मग तुम्ही केलंय काय? असा सवालही त्यांनी केला.