मुंबई : महाराष्ट्रातील सरकार नपुंसक आहे, अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारवर ताशेरे ओढले आहेत. त्यावरून शिंदे-फडणवीस सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे. तर कोर्टाला तसं म्हणायचंच नव्हतं. काही लोक कोर्टाच्या भाष्यातील एक ओळ काढून राईचा पर्वत करत असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मात्र, दैनिक ‘सामना’तून हाच मुद्दा पकडून पुन्हा एकदा राज्य सरकारवर टीका करण्यात आली आहे. दाढीवरून हात फिरवणे हा सुद्धा नपुंसकपणा आहे. आता नपुंसक शेऱ्यावरही हक्कभंग आणणार काय? असा संतप्त सवाल दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून करण्यात आला आहे.
दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. धर्माचे राजकारण करून सत्ता मिळवणे आणि त्यासाठी लोकांचा बळी देणे ही नामर्दानगी आहे. मंत्रालयासमोर तिघांनी जीव देण्याचा प्रयत्न केला. शीतल गाडेकरचा मृत्यू झाला. या घटनांकडे थंडपणे पाहत दाढीवर हात फिरवणे हा सुद्धा नपुंसकपणाच आहे. सर्वोच्च न्यायालयाने अवमान केला म्हणून सत्तेतले चोरमंडळ आता नपुंसक शेऱ्यावरूनही हक्कभंग आणणार काय? असा सवाल दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डीलिट देण्यात आली आहे. त्यावरूनही त्यांनी टीका केली आहे. आता ते आयतेच डॉक्टर झाले आहेत. त्यामुळे जगाचे ज्ञान त्यांनी घेतले पाहिजे. कोणतेही ज्ञान खोक्यातून मिळत नाही. ते अनुभवातूनच मिळते. धर्मांध विचाराच्या कचऱ्यातून तर अजिबातच नाही, असा चिमटा काढतानाच राज्यात सत्ता मिळावी म्हणून कामाख्या देवीच्या मंदिरात रेड्यांचे बळी दिले जातात. हे काही पुरोगामी महाराष्ट्राचे लक्षण नाही. धर्म ही अफूची गोळी आहे. ती बंदुकीच्या गोळीपेक्षाही घातक आहे, असं अग्रलेखातून म्हटलं आहे.
जगभरात धर्मांधतेमुळे अनेक देश तुटले. भारताचीही फाळणी झाली. आता नवा घाव भारताला परवडणारा नाही. त्यामुळे धर्माचे राजकारण करणे, त्यातून सत्ता मिळवणे आणि त्यासाठी लोकांचा बळी देणे ही नामर्दानगी आहे, अशी टीकाही करण्यात आली आहे.