मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांचा शिंदे गटावरील हल्लाबोल अजूनही सुरूच आहे. मुंबईतील शाखांच्या उद्घाटनाचा प्रसंग असो, वाढदिवसाचा प्रसंग असो की शिवसेना (shivsena) नेते आणि पदाधिकाऱ्यांसोबतची बैठक असो, संधी मिळताच उद्धव ठाकरे हे बंडखोर आमदारांवर कठोर शब्दात टीका करत आहेत. आजही त्यांनी एका कार्यक्रमातून त्यांनी बंडखोरांची पिसे काढली. भाजपचा (bjp) वंश नेमका कोणता? सगळे रेडिमेड आहेत. हायब्रीड आहेत. वंश विकत घेतायत. जे मोठे केलेले माझ्या सोबत नसले तरी त्यांना मोठे करणारे माझ्यासोबत आहे, असा हल्ला करतानाच आतापर्यंत त्यांनी गुलाब पाहिले. आता काटे पहा, असा इशाराच उद्धव ठाकरे यांनी दिला. गुलाबाचे झाड माझ्याकडे आहे. पुन्हा नवीन गुलाब फुलवीन, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
गेले महिनाभर मातोश्रीवर गर्दी आहे. आपली लढाई 2-3 पातळीवर सुरू आहे. रस्त्यावरच्या आणि कागदावरच्या लढाईत आपण मागे पडणार नाही. कायद्याची लढाई सुरू आहे. न्याय देवतेवर माझा विश्वास आहे. वकील योग्य बाजू मांडत आहेत, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
आतापर्यंत शिवसेना फोडण्याचे अनेक प्रयत्न झाले. पण आता शिवसेनेला संपवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, हे मी आधीच बोलो होतो. हे परवा भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी बोलून दाखवलं की शिवसेना संपत चाललेला पक्ष आहे. त्यांना माहिती नाही अशी आव्हानं पायदळी तुडवत त्याच्यावर झेंडा रोवला आहे. राजकारणात हार जीत होत असते पण संपवण्याची भाषा केली जात नाही, असा हल्लाही त्यांनी चढवला.
दरम्यान, शिवसेनेत आधी आमदारांनी आणि नंतर खासदारांनी बंड केलं. त्यामुळे शिवसेनेत एकच खळबळ उडाली. त्यानंतर बंडखोरांनी केवळ भाजपशीच हातमिळवणी केली नाही तर शिवसेनेवर दावा करण्यास सुरुवात केली. त्यामुळे शिवसेनेत अधिकच खळबळ उडाली. त्यानंतर शिवसेनेने शिवसंवाद यात्रा सुरू केली आहे. आदित्य ठाकरे राज्यभर शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून फिरत असून शिवसैनिकांशी संवाद साधत आहेत. आमदार आणि खासदार गेले असले तरी शिवसैनिक आपल्यासोबतच ठेवण्यासाठी शिवसेनेने प्रयत्न सुरू केले आहेत. शिवसैनिक, पदाधिकाऱ्यांकडून प्रतिज्ञापत्रेही घेतली जात आहेत. तसेच या महिन्यापासून उद्धव ठाकरेही राज्यभर दौरा काढून शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत.