मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने राज्यात कालपासून सावरकर गौरव यात्रा सुरू केली आहे. या यात्रेला म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. जळगावमध्ये मंत्री गिरीश महाजन यांनी या यात्रेला हिरवा कंदील दाखवला. मात्र या यात्रेवरून दैनिक सामनाच्या अग्रलेखातून जोरदार टीका करण्यात आली आहे. विनायक दामोदर सावरकर यांना दाढीचा प्रचंड तिरस्कार होता. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा त्यांच्या दाढीला कात्री लावतील काय? गुळगुळीत दाढी करतील काय? असा सवाल दैनिक सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आला आहे.
धर्माचे राजकारण करून पोळ्या भाजायच्या हे मिंधे सरकारचे धोरण आहे. त्यावरच सर्वोच्च न्यायालयाने टीका केली आहे. आता हिंदुत्वाच्या नावावर सावरकर गौरव यात्रा काढली जात आहे. ज्यांनी कधी सावरकरांच्या साहित्याची चार पाने चाळली नाहीत, ते आता सावरकर गौरव यात्रा काढत आहेत. सावरकरांच्या नावाने गौरव यात्रा काढायाची तर काढा. पण त्याआधी त्यांना भारतरत्न तर द्या. भारतरत्न पुरस्कार हाच सावरकरांचा खरा गौरव ठरेल, असा टोला दैनिक सामनाच्या अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.
विनायक दामोदर सावरकर यांना दाढीचा अत्यंत तिरस्कार होता. त्यासाठी त्यांनी तुर्कस्तानच्या केमाल पाशाचे धोरण स्वीकारले होते. त्यामुळे सावरकरांना मान्य नसलेल्या दाढीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुळगुळीत कात्री लावतील काय? असा सवाल अग्रलेखातून करण्यात आला आहे. दाढी वाढवण्याचे प्रकार, शेंडी, जानवे, गाईला गोमातेचा दर्जा देणे आदी कर्मकांड सावरकरांना मान्य नव्हते. त्यांना जादूटोणा, मंत्रतंत्र आणि रेडाबळी अशा गोष्टीही मान्य नव्हत्या. गौरव यात्रा काढणारे सावरकरांच्या या विचारांचाही प्रसार करणार काय?, असा सवालही अग्रेलखातून करण्यात आला आहे.
अग्रलेखातून ढोंगी हिंदुत्वावरही टीका करण्यात आली आहे. सध्याच्या काळात हिंदुत्वाच्या नावावर काहीही खपवले जात आहे. बाळासाहेब ठाकरे यांना तर धर्माचे राजकारण मान्य नव्हते. मला हिंदूंचा खोमेनी व्हायचं नाही, असं बाळासाहेब ठाकरे म्हणायचे. पण सध्या महाराष्ट्राचे राजकारण खोमेनीच्या मार्गानेच सुरू आहे, असं सांगतानाच आता हा खोमेनी कोण? हे डॉ. मिंधे यांनी विचारू नये, असा चिमटाही त्यांनी काढला आहे.
महाविकास आघाडीची संभाजीनगरमध्ये सभा होणार आहे. त्याची जय्यत तयारी सुरू आहे. मात्र, त्यापूर्वीच संभाजीनगरात दोन गटात हाणामारी झाल्याने तणाव निर्माण झाला आहे. त्यावरही अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे. संभाजीनगरात महाविकास आघाडीची सभा होत आहे. त्यापूर्वीच धार्मिक तेढ निर्माण करून दंगा करण्याचा प्रकार घडला. संभाजीनगरात आजही तणावाचे वातावरण आहे. राज्यात ऊठसूट लव्ह जिहादच्या नावावर हिंदू आक्रोश मोर्चे काढून तेढ निर्माण होईल अशी भाषणे केली जातात, असा आरोपही करण्यात आला आहे.