उद्धव ठाकरे म्हणाले ‘युतीत 25 वर्षे सडली’; मग 2 वर्षात काय कमावलं? प्रवीण दरेकरांचा सवाल

| Updated on: Jan 23, 2022 | 11:56 PM

मुख्यमंत्री त्यांचा असूनही निवडणुकीत शिवसेना चौथ्या क्रमांकावर फेकली गेली, याचं आत्मपरीक्षण करा. मग अस्वस्थता का आहे? सरकार असूनही आपली वाढ का होत नाही? भाजपवर तर परिणाम नाही. राज्यातील सगळ्या निवडणुकीत भाजप पहिल्या नंबरवर आहे. तुमच्याशिवाय आम्ही पहिल्या क्रमांकावर आहोत आणि तुम्ही चौथ्या नंबरवर आहात हे लक्षात घ्या, अशी टीका दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांवर केलीय.

उद्धव ठाकरे म्हणाले युतीत 25 वर्षे सडली; मग 2 वर्षात काय कमावलं? प्रवीण दरेकरांचा सवाल
प्रवीण दरेकर, उद्धव ठाकरे, अतुल भातखळकर
Follow us on

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या जयंतीनिमित्त शिवसैनिकांशी संवाद साधताना शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर सडकून टीका केली. यावेळी शिवसेनेची 25 वर्षे युतीत सडली असा पुनरुच्चार उद्धव ठाकरे यांनी केलाय.आम्ही हिंदुत्वापासून कदापी दूर जाऊ शकत नाही. आम्ही भाजपला सोडलं, आम्हि हिंदुत्व सोडलं नाही, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या टीकेला आता विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय आहे.

25 वर्षे त्यांना वाटलं नाही की सडलो आणि दोन वर्षात त्यांना वारंवार साक्षात्कार होतोय. त्याचं कारण सत्ता असूनही जी घुसमट, जे वैफल्य बाहेर पडताना दिसत आहे. 25 वर्षे भाजपसोबत सडली तर मग दोन वर्षात शिवसेना वाढली का? मुख्यमंत्री त्यांचा असूनही निवडणुकीत शिवसेना चौथ्या क्रमांकावर फेकली गेली, याचं आत्मपरीक्षण करा. मग अस्वस्थता का आहे? सरकार असूनही आपली वाढ का होत नाही? भाजपवर तर परिणाम नाही. राज्यातील सगळ्या निवडणुकीत भाजप पहिल्या नंबरवर आहे. तुमच्याशिवाय आम्ही पहिल्या क्रमांकावर आहोत आणि तुम्ही चौथ्या नंबरवर आहात हे लक्षात घ्या, अशी टीका दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांवर केलीय.

‘सरकारचं सुख ना महाराष्ट्राला ना शिवसैनिकांना’

चांगलं वागवलं म्हणूनच तुम्ही 25 वर्षे तुम्ही संसार केला. आता तुम्हाला कसं वागवलं जात आहे. आता सरकारमध्ये आहात पण सरकारचं सुख ना महाराष्ट्राला ना शिवसैनिकांना. मला सांगा, सरकार असूनही आपल्या आमदारांना किती निधी मिळाला याची आकडेवारी जाहीर करा सामनातून, शिवसैनिकांना कुठल्याप्रकारे लाभ मिलाला हे जाहीर करा. त्यांच्यात अस्वस्थता आहे. राष्ट्रवादीने आपल्या आमदारांसाठी दोन अडीच लाख कोटी रुपये निधी नेला. त्यानंतर काँग्रेस आणि मग शिवसेना. त्यावरुन सरकारमध्ये काय चाललं आहे हे आपल्या लक्षात येतं, असा खोचक टोला दरेकर यांनी शिवसेनेला लगावला आहे.

अतुल भातखळकरांचाही निशाणा

भाजप आमदार अतुल भातखळकर यांनीही मुख्यमंत्र्यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. “नेहमीप्रमाणे भाजपा बद्दलची मळमळ, जळजळ आणि कोहीती दिशा-धोरण नसलेले पकाऊ भाषण”, असं ट्विट अतुल भातखळकर यांनी केलं आहे.

तसंच राज्यात शिवसेनेसोबत सत्तेत असलेल्या काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांनी बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली नसल्याचा मुद्दा उपस्थित करत भातखळकर यांनी शिवसेनेला खोचक टोला लगावलाय. “पोकळ स्वाभीमान आणि बोगस हिंदुत्त्वाबद्दल बाता करणाऱ्यांना दिल्लीच्या मालकाने शिवसेनाप्रमुखांना यंदाही आदरांजली व्यक्त न करता फाट्यावर मारले आहे. हाच यांचा कणा नसलेला बाणा”, असंही भातखळकर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

इतर बातम्या :

दिल्ली काबीज करु… बाळासाहेबांच्या जयंतीदिनी उद्धव ठाकरेंकडून शिवसेनेची पुढची वाटचाल स्पष्ट

‘राज्यात मुघल पुन्हा कबरीतून अवतारले, ज्वलंत हिंदुत्ववादी मुख्यमंत्र्यांच्या सरकारमध्ये वीर टिपूची उद्याने’