उद्धव ठाकरे यांनी उत्तर भारतीय बिल्डरासाठी माझं तिकीट कापण्याचा प्रयत्न केला; गजानन कीर्तिकर यांचा आरोप

| Updated on: Nov 12, 2022 | 10:26 AM

शिवसेना एवढी ताकदवान आहे. दोन दोन लाखांचा दसरा मेळावा शिवसेना घेते. इकडे आणि तिकडे एवढ्या मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहतात.

उद्धव ठाकरे यांनी उत्तर भारतीय बिल्डरासाठी माझं तिकीट कापण्याचा प्रयत्न केला; गजानन कीर्तिकर यांचा आरोप
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर खासदार गजानन कीर्तिकर यांनी शिवसेनेत झालेली कुंचबना बोलून दाखवली आहे. ही कुंचबना बोलून दाखवतानाच उद्धव ठाकरे यांच्यावरही गंभीर आरोप केला आहे. 2004मध्ये उद्धव ठाकरे यांनी माझं तिकीट कापण्याचा प्रयत्न केला होता. एका उत्तर भारतीय बिल्डरला तिकीट देण्यासाठी माझा पत्ता कापला जाणार होता. पण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे मला तिकीट मिळालं, असा आरोप गजानन कीर्तिकर यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

खासदार गजानन कीर्तिकर यांनी मीडियाशी संवाद साधताना हा आरोप केला आहे. मी 56 वर्ष शिवसेनेसोबत आहे. ज्येष्ठ आणि निष्ठावंत म्हणून मला बिरुदावली मिळालेली आहे. उद्धव ठाकरे यांनी 2004 मध्ये माझं तिकीट कापण्याचा प्रयत्न केला.

हे सुद्धा वाचा

व्हि के सिंह नावाचा उत्तर भारतीय बिल्डर आहे. त्याचा भाऊ रमेश सिंह आहे. त्याला तिकीट देण्यासाठी उद्धव ठाकरे आणि बिल्डरची गुफ्तगू सुरू होती. काय गुफ्तगू सुरू होती मला माहीत आहे. पण बाळासाहेबांनी ते होऊ दिलं नाही. मला तिकीट दिलं, असा आरोप गजानन कीर्तिकर यांनी केला.

मला बाळासाहेबांनी चौथ्यांदा तिकीट दिलं. त्यानंतर 2009मध्ये माझा पत्ताच कट केला. मला उमेदवारी दिली नाही. सुनील प्रभू म्हणून माझा पीए आहे. त्याला सारखं बंगल्यावर बोलवून मी तुला तिकीट देणार आहे. कीर्तिकरांना तिकीट देणार नाही. तू कामाला लाग असं सांगितलं गेलं. काय चाललं आहे. एवढा मोठा पक्षप्रमुख असा विचार करतो? असा उद्वेग कीर्तिकर यांनी व्यक्त केला.

शिवसेनेत असताना तोंड दाबून बुक्क्याचा मार होता. आम्ही अपमान सहन करत होतो. पण आम्ही शिवसेना सोडून गेलो नाही. आमचा अपमान होत होता. 2019ला आम्ही एनडीएसोबत होतो. आम्हाला मंत्रिपद मिळालं. पण ते अरविंद सावंतला दिलं. तुमची खासगी माणसं आणि तुमच्या मर्जीतल्या माणसाला दिलं. तेव्हा का शिवसेनेचा ज्येष्ठ नेता आठवला नाही? गजानन कीर्तिकर का आठवला नाही? असा सवाल त्यांनी केला.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जाऊ नका. ते शिवसेनेसाठी घातक असेल. या आघाडीमुळे शिवसेनाच उजाडेल, असं आम्ही उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं. त्यांना तसा प्रस्तावही दिला होता. आम्ही सांगितलं. आम्हाला वाटलं काही बदल होईल. ते झालं नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

शिवसेना एवढी ताकदवान आहे. दोन दोन लाखांचा दसरा मेळावा शिवसेना घेते. इकडे आणि तिकडे एवढ्या मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहतात. ही ताकद एकत्र झाली तर आपलाच पक्ष मोठा होईल. म्हणून समेट घडवावा असा आमचा आग्रह होता, असं त्यांनी सांगितलं.

40 आमदार गेले. 15 बाकी आहेत. 12 खासदार गेले. मी 13 वा गेलो. पाच बाकी आहेत. समेट घडवावा. भाजपसोबतची नैसर्गिक युती कायम ठेवावी. मुख्यमंत्रीपद त्यांनी आपल्याला दिलं आहे. त्याचा लाभ घेऊन संघटना बांधावी. शिवसैनिकांची कामे करावी. पण मला काही असं होताना दिसत नाही, असं ते म्हणाले.

या सर्व गोष्टींमुळेच शेवटी मी ठरवलं. उद्धव ठाकरे चुकीच्या मार्गाने जात आहेत. राष्ट्रवादी किंवा काँग्रेस या पक्षाशासोबत वाटचाल होत असेल तर शिवसैनिकांना धोकादायक आहे. शिवसेनेच्या भवितव्याला धोकादायक आहे. म्हणून मी एकनाथ शिंदे यांच्या पाठी उभं राहण्याचा निर्णय घेतला.