मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकरांना माफीवीर म्हणून त्यांचं तेज कमी होणार नाही. ज्या सत्यासाठी ते लढले, त्यांचा त्याग आधी समजून घ्या, असा थेट सल्ला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राहुल गांधी यांना दिली आहे. शिवसेनेचं (Shivsena) मुखपत्र सामना (Samana) वृत्तपत्रातून उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधींना खणखणीत इशारा दिला आहे. मालेगावातील सभेनंतर शिवसेनेने आज पुन्हा एकदा काँग्रेसला सुनालवंय. राहुल गांधी यांच्याविरोधात झालेल्या कारवाईवरून संपूर्ण देशात सहानुभूतीची लाट आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात शिवसेनेनेही राहुल गांधी यांच्यासोबत असल्याचं वक्तव्य केलं होतं. मात्र सावरकरांचा मुद्दा येताच शिवसेना पुन्हा एकदा बॅकफुटवर गेल्याचं दिसून येतंय. मालेगावच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांना थेट इशारा दिला. सावरकरांचा अपमान सहन करणार नाही, असा इशारा दिलाय.
वीर सावरकर हे त्यांच्या जागी थोर आहेत. सावरकरांना अकारण ‘माफीवीर’ वगैरे दूषणे लावून लढण्याचे बळ कुणाला मिळणार नाही. ‘वीर सावरकर’ या नावात तेज आहे. अन्याय व गुलामीविरुद्ध लढण्याचे बळ आहे. वीर सावरकरांनी इंग्रजांची सत्ता उलथवून टाकण्यासाठी इंग्लंड व आपल्या देशातही योद्धे निर्माण केले, त्या योद्धय़ांनी जुलमी राज्यकर्त्यांवर ‘धाडधाड’ गोळय़ा चालवल्या व त्या कृत्याबद्दल सावरकरांनी कधीच खेद व्यक्त केला नाही. सावरकरांनी ज्याप्रमाणे इंग्रजांविरुद्ध अनेक योद्धे उभे केले तसे प्रखर योद्धे राहुल गांधी यांना स्वतःच्याच पक्षात आधी उभे करावे लागतील. मानहानी प्रकरणात राहुल गांधी यांना शिक्षा ठोठावली हा अन्याय आहे, पण वीर सावरकरांची मानहानी करून ते ज्या सत्यासाठी लढू पाहत आहेत, त्या सत्याचा विजय होणार नाही, असा इशारा सामनाच्या अग्रलेखातून देण्यात आलाय.
सामना वृत्तपत्रातून शिवसेनेने राहुल गांधी यांना काहीशी सहानुभूती दर्शवतानाच कानही पिळले आहेत. इंदिरा गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द झाले तेव्हा देशात एक जबरदस्त चीड निर्माण झाली. तेव्हा वृत्तवाहिन्या, सोशल मीडियाचा वापर नव्हता. तरीही लोकांची मने इंदिरा गांधींच्या अन्यायाविरुद्ध धडकत होती व त्याच वातावरणाचा फायदा घेऊन इंदिरा गांधी पुन्हा वाजत गाजत सत्तेवर विराजमान झाल्या. राहुल गांधी हे सर्व नाटय़ कसे घडवणार? असा सवाल सामनातून करण्यात आलाय.
हुकूमशहा हा सदैव डरपोकच असतो. हुकूमशहा आधी न्यायव्यवस्था ताब्यात घेतो, संसदेवर ताबा मिळवतो व विरोधकांना नष्ट करतो. यालाच गुलामी म्हणतात. याच गुलामीविरुद्ध लढण्यासाठी वीर सावरकरांनी वयाच्या बाराव्या वर्षी घरातील अष्टभुजा देवीसमोर क्रांतिकारक शपथ घेतली, ”देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन!” राहुल गांधी यांनी अशीच शपथ घेऊन सध्याच्या गुलामीविरुद्ध लढा उभारायला हवा.