मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thakeray) यांनी शिवसेनेत (Shivsena) झालेल्या बंडाची हवा काढण्याचे कार्ड अवघ्या 18 मिनिटांच्या फेसबूक लाईव्हमधून (Facebook Live) फेकले. लाईव्हच्या माध्यमातून अगदी विनम्रतेने आणि विनयतेने बोलत संवाद पूल बांधण्याचा प्रयत्न त्यांनी केला. भावनिक आवाहन केले. बाळासाहेबानंतरच्या घडामोडींचे अनेक दाखले देत सहका-यांच्या मनातील संभ्रम आणि गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला. एवढेच नव्हे तर बंडाचे नेतृत्व करणा-या आणि हवा देणा-या नेत्यांना त्यांनी अलगद चिमटे ही काढले. राजीनाम्याचे कार्ड फेकत त्यांनी थेट या बंडाच्या प्रयोगावरच घाला घातला. पण हे सर्व करताना त्यांनी आगतिकता न दिसू देता, शिवसेनेचा विचार आणि स्वभाव टिकवून ठेवण्याचे आवाहन बंडखोरांना केले आहे. हिंदुत्वसाठी त्याग करण्याची त्यांनी तयारी दाखवली. त्यांचा समजवणीचा हा सूर आणि कानपिचक्या या बंडखोरांचे नेतृत्व करणारे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनाच होत्या. शिंदे यांचे नाव घेत अवघे 30 सेकंदात त्यांनी हा मुद्दा निकाली काढला. संपूर्ण लाईव्ह मध्ये त्यांनी शिंदे यांच्याद्वारे गेल्या दोन दिवसांत बंडखोरीची जी कारणे दिली, त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.
मुख्यमंत्री भेटत नाही हे एक कारण शिंदे यांच्या कडून करण्यात येत होता. ही गोष्ट मुख्यमंत्र्यांनी मान्य केली. मुख्यमंत्री भेटत नाहीत, काही दिवसांपूर्वी ही गोष्ट सत्य होती. कारण माझी शस्त्रक्रिया झाली. अनुभव सांगणार नाही. पण दोन ते तीन महिने मी भेटू शकत नव्हतो. हा मुद्दा बरोबर आहे. त्यानंतर मी भेटायला सुरुवात केली आहे. मी भेटत नव्हतो पण कामं थांबली नव्हती. कामं होत होती, असे सांगायला मुख्यमंत्री विसरले नाहीत. म्हणजे कामे होत नाही, निधी मिळत नाही ही बंडखोरांची ओरड त्यांनी खोडून काढली.
शिवसेना आणि हिंदुत्व घट्ट आहे.कोणी एकमेकांपासून तोडू शकत नाही. त्यामुळे आदित्य, एकनाथ शिंदे आमदार आणि खासदार अयोध्येला जाऊन आले. हिंदुत्वाबद्दल विधानसभेत बोलणारा मी कदाचित पहिला मुख्यमंत्री असेल. हिंदुत्व सोडल्याचा दावा बंडखोरांनी केला होता. हिंदुत्वाच्या मुद्यावर मुख्यमंत्र्यांनी शिंदे यांचे आरोप खोडत त्यांच्या भूमिकेवरच निशाणा साधला.
आता बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना राहिली नाही असं काही लोक भासवत आहेत.मी काय नेमकं वेगळं केलं की बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही. बाळासाहेब गेल्यानंतर 2014 साली आपण एकाकी लढलो. तेव्हाही तेच होतो आताही तसेच आहोत. तेव्हा प्रतिकूल परिस्थिती असताना 63 आमदार आले. तेव्हाही मंत्री होतो. आता मंत्रिमंडळात तेच मंत्री आहेत. मधल्या काळानंतर जे काही मिळालं ते बाळासाहेबांच्या शिवसेनेने दिलं हे लक्षात ठेवा. बंडखोरांची नेमकी हीच नस पकडत ठाकरे यांनी तीच नस दाबली.
शिवसेनेचे आमदार गायब केले. सुरतला नेले, गुवाहाटीला नेले. मला त्यात पडायचं नाही. ही कोणती लोकशाही असा सवाल करत लघवीला गेला तरी शंका घेतल्या जात असल्याचे ते म्हटले. जे काही घडलं त्याचा अनुभव नव्हता. असे स्पष्ट करत, मी जिद्दीने काम करणारा माणूस आहे. मी शिवसेना प्रमुखांना दिलेलं वचन पूर्ण करणारचं म्हणून रगणागणात उतरल्याचा इशारा ही त्यांनी दिला.
माझ्यासमोर येऊन बोला.शिवसेनेशी गद्दारी करणार नाही. ही शिवसेना आमची आहे ते. या गोष्टी कशाला करत आहात. त्यामुळे नुकसान कुणाचं होत आहे एक गोष्ट आहे कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ.हीच ती गोष्ट आहे. ज्या कुऱ्हाडीने घाव घातला जातोय त्याचं लाकूड माझ्या फांदीचं आहे. त्याच्या मला वेदना होत आहेत. हेच आज चाललं आहे. कुऱ्हाडीचा दांडा हा गोतास काळ म्हणजे आपली राजकारणातील जन्मदात्री आहे. तिचचं लाकूड वापरून घाव घालू नका. या समोर बसा मी राजीनामा देतो. तुमच्या हातात राजीनामा देतो. आज तयार करतो. तुम्ही या आणि माझं राजीनामा पत्रं द्या राज्यपालांना असं आवाहन करत शिंदे यांच्या महत्वकांक्षेवर त्यांनी हल्ला चढवला.