Uddhav Thackeray Vs Rana : इकडे कुणी हिंमत करणार नाही, मुख्यमंत्री मातोश्रीवरून थेट शिवसैनिकांत, राणांविरोधात ‘रात्र’ जागवण्याचा महिला सैनिकांचा शब्द

| Updated on: Apr 22, 2022 | 8:35 PM

रात्री 8 च्या सुमारास मातोश्रीवर बैठक आटोपून मुख्यमंत्री पुन्हा वर्षा बंगल्यावर जाण्यासाठी निघाले असता शिवसैनिक अजूनही तिथेच होते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला आणि त्यांना घरी जाण्याचं आवाहन केलं.

Uddhav Thackeray Vs Rana : इकडे कुणी हिंमत करणार नाही, मुख्यमंत्री मातोश्रीवरून थेट शिवसैनिकांत, राणांविरोधात रात्र जागवण्याचा महिला सैनिकांचा शब्द
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मानले शिवसैनिकांचे आभार
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : अमरावतीचे खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) पठण करण्याचं आव्हान दिलं आहे. त्यासाठी राणा दाम्पत्य आज मुंबईत दाखल झालं आहे. अशावेळी मातोश्रीबाहेर (Matoshri) सकाळपासून मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जमा झाले. सकाळपासून नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या विरोधात मातोश्रीबाहेर जोरदार घोषणाबाजी सुरु होती. तसंच राणा दाम्पत्याने मातोश्रीबाहेर येऊनच दाखवावं असं आव्हान शिवसैनिकांकडून दिलं गेलं. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दुपारी साडे चार वाजता वर्षा बंगल्यावरुन मातोश्रीवर दाखल झाले. त्यावेळी गाडीतून उतरून त्यांनी हात उंचावून शिवसैनिकांचे आभार मानले. रात्री 8 च्या सुमारास मातोश्रीवर बैठक आटोपून मुख्यमंत्री पुन्हा वर्षा बंगल्यावर जाण्यासाठी निघाले असता शिवसैनिक अजूनही तिथेच होते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला आणि त्यांना घरी जाण्याचं आवाहन केलं.

राणा दाम्पत्याचं आव्हान आणि मातोश्रीवर शिवसैनिक आक्रमक

नवनीत राणा आणि रवी राणा यांनी मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा पठण करण्याचं आव्हान दिलं होतं. त्यानुसार ते आज मुंबईत दाखलही झाले. त्याची माहिती मिळताच सकाळपासूनच मातोश्रीबाहेर शिवसैनिकांनी गर्दी करायला सुरुवात केली. राणा दाम्पत्याविरोधात जोरदार घोषणाबाजीला सुरुवात झाली. खासदार विनायक राऊत, खासदार अनिल देसाई, माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि किशोरी पेडणेकर, युवा सेना सचिव वरुण सरदेसाईही मातोश्रीबाहेर शिवसैनिकांचा उत्साह वाढवत होते. मातोश्रीवर महाप्रसादाची तयारी झाली आहे. राणा दाम्पत्याने येऊन महाप्रसाद घेऊन जावा, असा इशाराच त्यांनी दिला होता. अशावेळी मुंबई पोलिसांकडून राणा दाम्पत्याला खार इथल्या निवासस्थानी जाऊन 149 अंतर्गत नोटीसही बजावण्यात आली. त्यानंतर दुपारी पत्रकार परिषदत घेत आपण मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसाचं पठण करणारच. उद्या सकाळी 9 वाजता मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसाचं वाचन करणार, असा इशारा राणा दाम्पत्याने दिला आहे.

मातोश्रीवर खलबतं, राणा दाम्पत्याला प्रत्युत्तर मिळणार?

दिवसभरातील घडामोडीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दुपारी साडे चारच्या सुमारास मातोश्रीवर दाखल झाले. त्यांनी गाडीतून उतरून शिवसैनिकांना हात उंचावत आणि हात जोडून आभार मानले. त्यानंतर मातोश्रीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आदित्य ठाकरे, विनायक राऊत, अनिल देसाई, अनिल परब, किशोरी पेडणेकर, विश्वनाथ महाडेश्वर, वरुण सरदेसाई आदी नेत्यांची बैठक झाली. राणा दाम्पत्याने दिलेल्या आव्हानाला कशाप्रकारे प्रत्युत्तर द्यायचं, उद्याची रणनिती काय असावी? यावर या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मिळतेय.

उद्धव ठाकरेंना शिवसैनिकांचा शब्द

मातोश्रीवरील बैठक आटोपून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रात्री 8 च्या सुमारास मातोश्रीवर वर्षा या शासकीय निवासस्थानी जायला निधाले. त्यावेळी मातोश्रीबाहेर सकाळपासून ठाण मांडून बसलेल्या शिवसैनिकांची त्यांनी भेट घेतली. हात जोडून त्यांचे आभार मानले. तसंच इथे येण्याची हिंमत कुणी करणार नाही. तुम्ही सकाळपासून इथे आहात आता घरी जा, अशी विनंतीच उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केली. त्यावेळी महिला शिवसैनिकांनी साहेब, आम्ही रात्रभर इथे थांबतो. तुम्ही काळजी करु नका, असा शब्द मुख्यमंत्र्यांना दिला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर कृतज्ञतेचे भाव पाहायला मिळाले. मुख्यमंत्री मातोश्रीवरुन वर्षा निवासस्थानी जायला निघाले असताना शिवसैनिकांनी पुन्हा एकदा जोरदार घोषणाबाजी केली.

इतर बातम्या :

Chandrakant Patil : ‘थापा मारून दिवस ढकलणे बंद करा’, चंद्रकांत पाटलांचा जयंत पाटलांना टोला

Uddhav Thackeray : राणा दाम्पत्यांच्या विरोधात मुख्यमंत्र्यांचं शिवसैनिकांना पाठबळ, हात जोडून अभिवादन आणि हातही उंचावला

Navneet Rana and Ravi Rana : ‘मातोश्रीवर जाणार आणि हनुमान चालिसा वाचणारच’, राणा दाम्पत्याच्या पत्रकार परिषदेतील 5 महत्वाचे मुद्दे