मुंबई : “मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राला कोरोना संकट काळात खूप चांगल्या पद्धतीने सांभाळलं. ते सर्वांना सोबत घेऊन चालत आहेत. आपुलकीने सर्वांशी बोलत आहेत. घरातील कुटुंबप्रमुखाप्रमाणे ते सर्वांना समजवतात. त्यांनी ज्याप्रकारे महाराष्ट्राला सांभाळलं त्याने मी प्रभावित झाली आहे. अशा नेतृत्वासोबत काम करण्याची माझी इच्छा आहे”, अशी प्रतिक्रिया अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर दिली (Urmila Matondkar appreciate work of CM Uddhav Thackeray).
अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आज अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश केला. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’ येथे जाऊन मनगटावर शिवबंधन बांधलं. शिवसेना प्रवेशानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्यामागील कारण सांगितलं. त्याचबरोबर त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कार्यप्रणालीचं कौतुक केलं.
“गेल्या दहा महिन्यांचा काळ महाराष्ट्रासाठी खूप कठीण होता. मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे. जगभरातील लाखो लोक इथे येतात. कोरोना संकटाला तोंड देणं खूप कठीण होतं. दरम्यानच्या काळात महाराष्ट्रावर प्रचंड नैसर्गिक संकटं आली. चक्रीवादळ, अतिवृष्टी यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं. पण या काळात महाविकास आघाडी सरकारने केलेलं काम जबरदस्त आहे. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे”, असं उर्मिला म्हणाल्या.
राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या जागांसाठी शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर यांचं नाव निश्चित करण्यात आलं आहे. उर्मिला यांना याबाबतचा प्रस्ताव कुणी आणि कसा विचारला? असा प्रश्न पत्रकार परिषदेत विचारण्यात आला. यावर मुख्यमंत्र्यांचा फोन आलेला, असं उत्तर उर्मिला यांनी दिलं.
“मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोन आला. उद्धव यांनी मला खूप चांगली गोष्ट सांगितली. ते म्हणाले, आपल्या महाराष्ट्राच्या विधान परिषदेची परंपरा मोठी आहे. विधान परिषदेत महाराष्ट्राचा सांस्कृतिक आणि सामाजिक दर्जा वाढावा अशी माझी मनापासून इच्छा आहे. कारण या जागेवर जाण्यासाठी लोकांना खूप मोठा प्रवास करावा लागतो. त्या जागेचा दर्जा आणखी वाढला पाहिजे. त्यासाठी तुमच्या सारख्या लोकांची गरज आहे. उद्धव यांचे हे विचारच मला खूप आवडले. महाराष्ट्र सांस्कृतिक आणि सामाजिक मुल्यांवर नेहमी पुढे राहिला आहे. या मुल्यांना जपणं जरुरीचं आहे. त्यासाठीच त्यांनी माझी निवड केली”, असं उर्मिला यांनी सांगितलं (Urmila Matondkar appreciate work of CM Uddhav Thackeray).
संबंधित बातम्या :
शिवसेनेत प्रवेश करताच उर्मिलांचा मराठी बाणा, कंगनाला सॉलिड टोला
मी जन्माने आणि कर्मानेही हिंदू, सेक्युलर असणं म्हणजे द्वेष करणं नाही: उर्मिला मातोंडकर