योगेश बोरसे, पुणे | दि. 12 मार्च 2024 : पुणे शहरातील चर्चेतील व्यक्तीमत्व आणि मनसेचे नेते वसंत मोरे यांनी पक्ष सोडला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत अखेरचा जय महाराष्ट्र…साहेब मला माफ करा..असे त्यांनी म्हटले. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मनसेला हा मोठा झटका मानला जात आहे. आता वसंत मोरे यांची पुढची वाटचाल काय? ते लोकसभा निवडणूक लढवणार आहे का? कोणत्या पक्षाकडून ते निवडणूक लढवणा? या प्रश्नांची उत्तरे त्यांनी ‘टीव्ही ९ मराठी’ला दिला. तसेच पक्षात काय सुरु आहे, त्याची माहिती त्यांनी दिली.
मनसेमध्ये माझ्यावरती सारखे आरोप होत होते. वसंत मोरे नाराज असल्याच्या बातम्या पेरल्या जात होत्या. पक्षात राहून माझ्या चारित्र्यावर, माझ्या वागणुकीवर आरोप केला जात होता. यामुळे पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय मी घेतला. मी मनसेमध्ये एवढी वर्ष होते. परंतु कधी व्यक्ती केंद्रीत राजकारण केले नाही. माझी आता कुठलीही भूमिका नाही. मी पक्षातील सर्व पदाचे राजीनामे दिले आहेत. पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व सोडलं आहे. मी आता संघटनेत नाही. माझी पुढची भूमिका आता पुणेकर ठरवतील.
माझ्यासंदर्भात नको त्या गोष्टी साहेबांकडे सांगितल्या जात होत्या. माझ्या निष्ठेवर प्रश्न चिन्ह निर्माण केले जात होते. वारंवार मला सिद्ध करावे लागत होते की मी पक्षनिष्ठ आहे. मला फक्त अग्नीपरीक्षा देणेच बाकी राहिले होते. पुणे शहरात मनसेमध्ये माझ्याविरोधात जे राजकारण होते, त्यामुळे मी बाहेर पडलो, असे वसंत मोरे यांनी सांगितले.
मी मनसे सोडली आहे. आता माझी पुढची भूमिका आमचे पुणेकर ठरवतील. तसेच लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत मी येत्या दोन, तीन दिवसांत भूमिका जाहीर करणार आहे. मला कोणत्या पक्षांकडून ऑफर मिळाली का? त्या विषयावर मी आता बोलणार नाही. परंतु दोन तीन दिवसांत मी पुणेकरांशी बोलणार आहे. त्यानंतर निर्णय घेणार आहे. मी एखाद्या पक्षाकडून निवडणूक लढवावी की अपक्ष याबाबतचा निर्णय त्यावेळीच जाहीर करेल. काही दिवसांपूर्वी वसंत मोरे यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे वसंत मोरे पुण्यातून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवणार का? ही चर्चा सुरु आहे.