सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघ परंपरेने काँग्रेसच्या वाट्याला येतो. मात्र यावेळी आघाडीच्या जागावाटपात सांगलीची जागा खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्याच्या हालचाली सरु झाल्या असल्याने, काँग्रेसला पक्षाअंतर्गत जोरदार धक्का बसला आहे. माजी केंद्रीय मंत्री प्रतिक पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि त्यानंतर आता वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील हे सांगलीतून अपक्ष लढणार आहेत. त्यामुळे काँग्रेसला एकाच दिवशी दोन धक्के बसले आहेत.
सांगली लोकसभा मतदारसंघ आघाडीकडून स्वाभिमानीला दिला जाणार असल्याने सांगलीतील काँग्रेस कार्यकर्ते आणि वसंतदादा पाटील यांना मानणारे नाराज आहेत.
माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील हे सांगली लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. कार्यकर्त्यांची इच्छा असेल, तर मी निवडणूक लढवायला तयार आहे, लोकसभा निवडणुकीसाठी मी काँग्रेसचा अर्ज भरणार आहे, असे विशाल पाटील यांनी स्पष्ट केले. सांगलीमध्ये आयोजित वसंत दादा प्रेमी संवाद मेळाव्यात विशाल पाटील यांनी याबाबत घोषणा केली.
प्रतिक पाटलांचा विशाल पाटलांना सल्ला
“मी काँग्रेसच्या पक्षाचा राजीनामा देत आहे. काँग्रेस पक्षाशी माझं नात तोडलं आहे. आताची काँग्रेस ही इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांची राहिली नाही. विशाल पाटील काँग्रेसकडून अर्ज भर, जर एबी फॉर्म नाही आला, तर तो अर्ज अपक्ष होतोय, तू अपक्ष म्हणून लढ.” असा सल्ला माजी केंद्रीय मंत्री प्रतिक पाटील यांनी विशाल पाटील यांना दिला.
प्रतिक पाटील यांचा काँग्रेसला राम राम
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री आणि माजी खासदार प्रतीक पाटील यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. “मी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत आहे. मी काँग्रेस पक्षाशी माझं नात तोडलं आहे. वसंतदादाचे नाव हाच माझा पक्ष आहे”, असे सांगत प्रतीक पाटीलांनी काँग्रेसला राम-राम ठोकला आहे.
“आत्ताची काँग्रेस ही इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांची राहिली आहे का?”, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
“दिल्लीत जाऊन आम्ही लढायला तयार होतो. मात्र, आमच्याकडे पैसे नाहीत असं सांगितलं. त्यानंतर काँग्रेसने लगेच राजू शेट्टी यांना हा मतदारसंघ घ्या असं सांगितलं. सुरुवातीला राजू शेट्टी यांनी हा मतदारसंघ नको असं सांगितलं होतं”, असेही ते म्हणाले.