मुंबई: उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी नुकताच बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे शिंदे गटामध्ये प्रवेश केला. त्यांनी केलेला पक्षप्रवेश उत्तर पश्चिम मुंबईतील मतदारांचा अपमान असल्याने त्यांनी त्वरित खासदारकीचा राजीनामा द्यावा, या मागणीसाठी माजी खासदार व काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी आज मतदारसंघात बाईक रॅलीचं आयोजन केलं होतं. मात्र या रॅलीपूर्वीच संजय निरुपम यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
उत्तर पश्चिम जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आज दुपारी 2 वाजता बाईक रॅली काढण्यात येणार होती. संजय निरुपम यांच्या नेतृत्वात ही रॅली काढण्यात आली होती. पण त्यापूर्वीच पोलिसांनी संजय निरुपम ताब्यात घेऊन वर्सोवा पोलिस ठाण्यात नेलं. तसेच त्यांना बाईक रॅली काढण्यास अटकाव करण्यात आला.
आपल्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं ट्विट स्वत: संजय निरुपम यांनी केलं आहे. पोलीस माझ्या घरात घुसले आणि मला जबरदस्तीने ताब्यात घेतलं. मला वर्सोवा पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. हे पोलिसांचं गुंडाराज आहे, असं ट्विट संजय निरुपम यांनी केलं आहे.
पोलिसांनी दबाव टाकला. कोणत्याही कागदपत्राशिवाय, कोणतीही सूचना नसताना मला जबरदस्तीने उचलून नेलं. 10 ते 15 पोलिसवाले होते. मी एकटाच होतो. ते मला खेचत घेऊन गेले. मी काय करू शकतो? पोलिसांनी दिलेली वागणूक चुकीची आहे. आम्ही काही गुंड नाही. आम्ही राजकारणी आहोत, असं संजय निरुपम म्हणाले.
आम्ही रॅली काढणार होतो. गजानन कीर्तीकरांच्या विरोधात आम्ही आंदोलन करत होतो. ते निष्क्रीय खासदार आहेत. म्हणून आम्ही त्यांच्या विरोधात आंदोलन करत होतो. पक्ष सोडला तर खासदारकीही सोडा, ही आग्रही मागणी करण्यासाठी आंदोलन करत होतो, असं त्यांनी सांगितलं.
Police entered my home and had taken me away forcefully to Varsova police station. Police ka gundaraj
— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) November 16, 2022
आम्ही रूट ठरवला होता. त्यानुसार बाईक रॅली काढणार होतो. माझ्या विभागात तीन चार डीसीपी कार्यालये आहेत. आम्ही त्यांना रुट पाठवला होता. परवानगी मागितली होती. परवानगी देण्याची जबाबदारी त्यांची होती. पोलिसांनी काहीच कारण दिलं नाही. फक्त वरून आदेश आहे. तुम्ही रॅली काढू नका, असं पोलिसांनी सांगितलं, असा दावा त्यांनी केला.
वरून आदेश आहे. तुम्ही वर्सोवा पोलीस ठाण्यात चला असं पोलीस म्हणाले. आम्ही लोकशाहीत राहतो. एका राजकीय पक्षात काम करतो. राजकीय कार्यक्रम करण्याचा आम्हाला अधिकार आहे. तुम्ही परवानगी देत नाही म्हणजे आम्ही घरी बसायचं का? असा संतप्त सवाल त्यांनी केला.