तिरुवनंतपूरम: सलग दुसऱ्यांदा सत्ता आणून दाखविणारे ज्येष्ठ नेते पिनराई विजयन पुन्हा एकदा केरळचे मुख्यमंत्री होणार आहेत. ते 2016पासून केरळच्या मुख्यमंत्रीपदी आहेत. केरळचे कॅप्टन, धोतर नेसणारे मोदी आणि केरळचे स्टॅलिन म्हणून त्यांची ओळख आहे. अत्यंत गरीबीतून संघर्ष करत विजयन यांनी हा मोठा पल्ला गाठला आहे. विजयन यांच्या राजकीय कारकिर्दीवर टाकलेला हा प्रकाश… (veteran leader of left front, know about pinarayi vijayan)
ताडी बनविणारा समुदाय, पहिलं आंदोलन, हत्येचा आरोप
पिनराई विजयन हे मूळचे केरळच्या कन्नूर जिल्ह्यातील पिनराई गावातील आहेत. ते ताडी बनविणाऱ्या एलवा समुदायातून येतात. त्यांची घरची परिस्थिती बेताचीच होती. त्यांनी केरळमध्येच शिक्षण घेतलं. इकॉनॉमिकची पदवी घेतल्यानंतर काही काळ हँडलूम वर्कर म्हणून कामही केलं. विद्यार्थीदशेतच फेरीची भाडेवाढ करण्याच्या विरोधात त्यांनी आंदोलन केलं होतं. ते केरळ स्टुडेंट फेडरेशनचे सदस्य होते. कम्युनिस्टांमध्ये फूट पडल्यानतंर ही संघटना स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया म्हणून उदयाला आली. विजयन आणि काही डाव्या नेत्यांना संघाच्या एका कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणी आरोपी करण्यात आले होते. 1979 मध्ये संघाचे कार्यकर्ते वड्डीकल रामाकृष्णनच्या हत्येतील साक्षीदाराने साक्ष फिरवल्यामुळे विजयन यांना निर्दोष सोडण्यात आलं होतं. 1964मध्ये कम्युनिस्ट पार्टीत आलेले विजयन गेल्या 57 वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ आहेत.
आणीबाणीत तुरुंगवास
आणीबाणीला विरोध केला म्हणून त्यांना अटक झाली होती. त्यावेळी तुरुंगात त्यांच्यावर प्रचंड अत्याचार करण्यात आले होते. त्यामुळे ते स्टॉकहोम सिंड्रोम या आजाराचे शिकार झाल्याचं सांगण्यात येतं.
हुकूमशाही वृत्ती
भारतीय लोकतांत्रिक युवा परिसंघ (डीवायएफआय)चे नेते म्हणून विजयन हुकूमशाही पद्धतीने वागायचे. त्यांच्यावरील टीका ते सहन करत नसायचे, असं राजकीय विश्लेषक सागतात. कन्नूरमधील पक्षाच्या कामामुळे ते ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते व्ही. एस अच्युतानंद यांच्या जवळ आले. भाकप फुटल्यानंतर सीपीएमची स्थापना झाली. अच्युतानंद हे सीपीएमचे संस्थापक सदस्य होते.
ज्याने बोट धरलं, त्यालाच…
विजयन राज्य सचिव झाल्यावर अच्युतानंद यांच्यावर चौफेर टीका होऊ लागली. पक्षातून त्यांना सातत्याने विरोध होऊ लागला. त्यामुळे परिस्थिती इतकी बिघडली की ज्या अच्युतानंद यांनी त्यांना बोट धरून संघटनेच्या मुख्य प्रवाहात आणले त्याच अच्युतानंद यांना निवडणूक लढवण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. ही 2006मधील गोष्ट. त्यामुळे पक्षात प्रचंड हंगामा झाला. परंतु पक्षाने विजयन यांचा हा निर्णय फेटाळून लावला होता.
पॉलिट ब्युरोतून हकालपट्टी
अच्युतानंद हे केरळचे ब्रँड म्हणून ओळखले जायचे. पण पक्षाची शिस्त मोडण्यावरून त्यांच्यावर नेहमी टीका केली जायची. 1998मध्ये चराय गोविंदन यांचा मृत्यू झाल्यानंतर अच्युतानंद यांनीच विजयन यांना पक्षाचे राज्य सचिव बनवले. 1998 ते 2015 पर्यंत ते माकपा स्टेट कमिटीचे सेक्रेटरी होते. पक्षाचे 17 वर्षे राज्य सचिव बनण्याचा विक्रम त्यांच्या नावावर जमा आहे. मात्र राज्य सेक्रेटरी झाल्यानंतर अच्युतानंद यांच्यावर पक्षातून टीका होऊ लागली. अच्युतानंद आणि विजयन यांच्यातही वारंवार खटके उडत होते. दोघांमध्ये वारंवार वाद होत असल्याने अखेर पॉलिट ब्युरोने या दोघांचीही पॉलिट ब्युरोतून हाकलपट्टी केली होती.
वयाने लहान म्हणून मुख्यमंत्री
1970, 1977 आणि 1991 मध्ये ते विधानसभेची निवडणूक जिंकले. ते केरळ सरकारमध्ये मंत्रीही होते. पिनराई विजयन यांना पाच वर्षापूर्वी पहिल्यांदाच सीपीएमच्या पॉलिट ब्युरोने मुख्यमंत्री बनण्याची संधी दिली होती. तत्कालीन मुख्यमंत्री अच्युतानंद यांच्यापेक्षा 20 वर्षांनी लहान असल्याने त्यांना ही संधी देण्यात आली होती. अर्थात त्यावेळीही त्यांचं वय 72 वर्षे होतं. सीपीएममध्ये अच्युतानंद यांना मानणारा एक गट होता आणि दुसरा विजयन यांना मानणारा एक गट होता. त्यात विजयन यांच्या गटाचं वर्चस्व असल्याने मुख्यमंत्रीपदाची सूत्रे त्यांच्या हाती आली.
सीपीएमचा चेहरा बदलला
विजयन यांच्याकडे राज्याची सूत्रे येईपर्यंत सीपीएमही केरळमध्ये हिंदूचा पक्ष म्हणून ओळखला जात होता. तर काँग्रेसकडे मुस्लिम आणि ख्रिश्चनांची व्होटबँक होती. परंतु, केरळचं राजकारण सर्वोच्च शिखरावर असताना विजयन यांनी पक्षाचा हा चेहरा बदलला. त्यांनी अत्यंत खूबीने हे काम केलं. ख्रिश्चन, मुस्लिमांना आपल्याकडे वळवलं. नव्या सदस्यांना पक्षात घेतलं. पदं दिली. त्यामुळे पक्षात जुने सदस्य राहिलेच नाही. मोदींनी पंतप्रधानपद स्वीकारल्यानंतर जी स्टॅटेजी वापरली. जुन्या नेत्यांना बाजूला ठेवून पक्षाचा चेहराच बदलून टाकला. तेच विजयन यांनी केलं.
फंडसाठी चीनचा फंडा
संकटाच्या काळात राज्यातील नागरिकांसाठी आर्थिक बळ उभं करण्याकरिता विजयन यांनी चीनचा कित्ता गिरवला. त्यांनी चीनप्रमाणे परदेशात असलेल्या देशावासियांना मदतीची हाक दिली. खासकरून आखाती देशात कामाला असलेल्या मल्याळी जनतेला निधी देण्याचं आवाहन करून मोठा फंड उभारला. त्यातून जनतेच्या समस्या सोडवल्या गेल्या.
स्टॉकहोम सिंड्रोमचे शिकार
आणीबाणीच्या काळात तुरुंगात असताना त्यांनी प्रचंड मार खाल्ला. त्यांना प्रचंड टॉर्चर करण्यात आलं. त्यामुळे ते स्टॉकहोम सिंड्रोमचे शिकार आहेत. माजी मुख्यमंत्री के. करुणाकरन यांना पोलिसांचा वापर कसा करायचा हे माहीत होतं. परंतु, स्टॉक होम सिंड्रोमचे शिकार असलेले विजयन पोलिसांचा विषय येतो तेव्हा बॅकफूटवर जातात.
सबरीमालात कुचराई
विजयन कुशल प्रशासक, उत्तम मुख्यमंत्री, उत्कृष्ट संघटक, मास लिडर आणि पुरोगामी विचाराचे नेते आहेत. मात्र, असं असलं तरी मासिक पाळीत स्त्रियांना सबरीमाला मंदिरात प्रवेश देण्याचा मुद्दा आला तेव्हा विजयन यांनी कुचराई दाखवली. त्यामुळे विजयन यांच्यावर टीकाही झाली होती.
स्टॅलिन, मोदींशी तुलना
विजयन यांची तुलना नेहमी दोन बलाढ्य नेत्यांशी केली जाते. एक म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दुसरे म्हणजे सोव्हित संघाचे शक्तीशाली नेते जोसेफ स्टॅलिन यांच्याशी. विजयन यांना तर केरळमध्ये मुंडू मोदी म्हणजे धोतर नेसणारे मोदी म्हटलं जातं. तसेच त्यांना केरळचे स्टॅलिनही म्हटलं जातं. त्याचं कारण म्हणजे विजयन यांचा स्वभाव. विजयन हे अत्यंत हेकेखोर आणि हुकूमशाही प्रवृत्तीचे नेते आहेत. मोदी आणि स्टॅलिनमध्ये नेतृत्वाच्या ज्या खुबी आहेत, त्या सर्व खुबी विजयन यांच्याकडे आहेत. त्यामुळेच त्यांना टीकाकारांनी या पदव्या दिल्या जातात. याशिवाय त्यांना कॅप्टनही म्हटलं जातं. परंतु, कम्युनिस्ट विचारधारेत अशा पदव्या या अभिषाप मानल्या जातात. एक मजबूत नेता आणि कर्मठ मुख्यमंत्री असल्याचंही त्यांनी दाखवून दिलं आहे. ते मास लिडर आहेत. त्यामुळेच ते इतर डाव्या नेत्यांपेक्षा वेगळे आहेत.
स्टॅलिन स्टॅटेजी
विजयन यांचा स्वभाव जोसेफ स्टॅलिन सारखाच आहे. त्यांची कामाची पद्धतही तशीच आहे. सोव्हियत संघात कम्युनिस्ट पार्टीचे सचिव झाल्यानंतर स्टॅलिनने भविष्यात धोका वाटणाऱ्या प्रत्येक नेत्याला पक्षातून काढून टाकले होते. तिच स्टॅटेजी विजयन यांनी वापरल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात. मात्र, असं असलं तरी पक्षाच्या ध्येय धोरणाशी निगडीतच कोणताही प्रशासकीय किंवा राजकीय निर्णय ते घेत असतात, असंही विश्लेषक सांगतात. (veteran leader of left front, know about pinarayi vijayan)
लोकांचे कॅप्टन
विजयन यांनी मुख्यमंत्री म्हणून केरळमध्ये प्रचंड कामे केली आहेत. केरळमध्ये त्यांनी अनेक कल्याणकारी योजना राबविल्या आहेत. केरळच्या जनतेला पेन्शन देण्यापासून ते मोफत राशन देण्यापर्यंतची कामे त्यांनी केली आहेत. वादळाचे संकट, अतिवृष्टी आणि कोरोना व्हायरसचं संकट असो, प्रत्येक संकटात त्यांनी केरळच्या जनतेला हात दिला आहे. त्यामुळेच येथील जनता त्यांना प्रेमाने कॅप्टन संबोधते. (veteran leader of left front, know about pinarayi vijayan)
VIDEO | सुपरफास्ट 100 न्यूज | SuperFast 100 News | 8 AM | 4 May 2021 https://t.co/PdgX6SbbGw
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 4, 2021
संबंधित बातम्या:
बंगालमधून डावे ‘लेफ्ट’ का झाले?, पराभवाची मुख्य कारणे; वाचा सविस्तर
VIDEO: “मागच्यावेळी भाजपनं खातं उघडलं, यावेळी बंद करणार”, केरळच्या मुख्यमंत्र्यांनी करुन दाखवलं
(veteran leader of left front, know about pinarayi vijayan)