नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या सर्व टप्प्यांतील मतदान पार पडलं. त्यानंतर त्याच संध्याकाळी म्हणजे 19 मे रोजी संध्याकाळी सर्व वृत्तवाहिन्यांवर एक्झिट पोलही मांडण्यात आले. सर्वच एक्झिट पोलनुसार भाजपप्रणित एनडीएला बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र, माजी केंद्रीय मंत्री आणि देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे. एक्झिट पोल हे एक्झॅक्ट नाहीत, असे म्हणत व्यंकय्या नायडू यांनी एक्झिट पोलच्या अंदाजांवर शंका व्यक्त केली. एक्झिट पोलमधून सांगण्यात आलेले आकडे म्हणजे काही वास्तव नाही, असेही नायडू म्हणाले.
एक्झिट पोल म्हणजे अचूक अंदाज नसतात. आपण हे समजून घेतलं पाहिजे. 1999 सालापासून बहुतांश एक्झिट पोल चूक ठरले आहेत, असे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू म्हणाले.
गुंटूर येथील अनौपचारिक चर्चेत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू म्हणाले, “निवडणूक जिंकण्याचा विश्वास प्रत्येक पक्षाला आहे. 23 मेपर्यंत म्हणजे मतमोजणीपर्यंत प्रत्येकजण हा आत्मविश्वास दाखवत राहील. मात्र, त्याला कुठलाही आधार नसेल. त्यामुळे आपल्याला 23 मेची वाट पाहायला हवी.”
“देश आणि राज्यांना एका हुशार, कौशल्यपूर्ण आणि स्थिर सरकारची आवश्यकता आहे. मग कुठलेही सरकार असो. फक्त स्थिर हवे.” असे उपराष्ट्रपती नायडू म्हणाले.
दुसरीकडे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही एक्झिट पोलवर बोलताना ‘अंतिम निर्णय’ नसल्याचे म्हटले. मात्र, भाजपचीच सत्ता पुन्हा केंद्रात येईल, असेही सांगायला गडकरी विसरले नहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील सिनेमाच्या पोस्टरच्या लॉन्चिंगवेळी नितीन गडकरींनी एक्झिट पोलवरील आपली भूमिका मांडली.