Vidhan Parishad Election 2024 : सध्या सर्वत्र विधानपरिषदेच्या निवडणुकांची धामधुम सुरु आहे. त्यातच आता गेल्या दोन वर्षांपासून रिक्त असलेल्या विधानपरिषदेच्या सभापतीची निवड होणार असल्याची चर्चा रंगली आहे. सध्या सुरु असलेल्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनातच याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता विधानपरिषदेच्या सभापती पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून दावा करण्यात आला आहे. त्यामुळे विधानपरिषदेच्या पदासाठी महायुतीत चुरस रंगणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महायुतीत सहभागी होताना विधानपरिषदेत सभापती पद देण्याचे आश्वासन दिले होते, असे राष्ट्रवादीच्या सूत्रांचे म्हणणं आहे. विधान परिषदेत सध्या राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी, रामराजे नाईक निंबाळकर, सतीश चव्हाण, विक्रम काळे असे चार सदस्य आहेत. त्यामुळे अजित पवार गटाने विधानपरिषदेच्या सभापती पदावर दावा सांगितला आहे. तर दुसरीकडे भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडूनही सभापती पदावर दावा करण्यात आला आहे. भाजपकडून राम शिंदे तर शिवसेनेकडून निलम गोऱ्हे या विधानपरिषदेच्या सभापती पदासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे आता महायुतीकडून विधानपरिषद निवडणुकीची तारीख निश्चित करुन सर्वानुमते एकच उमेदवार निवडला जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विधानपरिषदेच्या सभापती पदासाठी ऑगस्ट 2022 मध्ये रामराजे नाईक निंबाळकर यांची मुदत संपली होते. त्यानंतर गेल्या कित्येक महिन्यांपासून सभापतीपद रिक्त आहे. त्यातच आता आगामी राजकारणाच्या दृष्टीने हे पद महत्त्वाचे असल्याने ते भरले जाईल, असे सांगितले जाते. विधानपरिषदेच्या सभापतीपदासाठी महायुतीत चुरस रंगणार याची शक्यता वर्तवली जात होती. त्यातच विधानपरिषदेच्या सभापतीपदाच्या निवडणुकीची तारीख ही राज्यपालांकडून निश्चित केली जाते. त्याआधी मुख्यमंत्री कार्यालयाकडून निवडणुकीची तारीख निश्चित करण्याची विनंती करणारे पत्र राज्यपालांना पाठवावे लागते.
येत्या शुक्रवारी अर्थसंकल्पीय अधिवेशन संपणार आहे. त्यानंतरचे पुढील अधिवेशन विधानसभा निवडणुकीनंतर होईल. त्यामुळे सभापती पदाची निवडणूक घ्यायची असल्यास आजच मुख्यमंत्र्यांकडून निवडणुकीची तारीख कळवण्याबद्दल पत्र जाणे गरजेचे आहे. विधानपरिषद सभागृहात 78 पैकी 27 जागा रिक्त असून महायुतीकडे बहुमत आहे. त्यातच आता अजित पवार गटाने सभापती पदावर दावा केल्याने निवडणुकीत ट्वीस्ट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.