Opposition on Team India Price Money : टी-20 वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघाचा महाराष्ट्र विधान भवनात मोठा सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्ल्ड कप विजेत्या टीमसाठी 11 कोटी रुपये इतकी पारितोषिक रक्कम घोषित करण्यात आली. आता यावरुन राजकारण पाहायला मिळत आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यावरुन सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. तर दुसरीकडे प्रसाद लाड यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
वर्ल्डकप विजेत्या टीमला खूप पैसे मिळतात. भारताची स्पोर्ट्स स्पिरिट चांगली आहे. त्यांच्या भावनांची कदर करत मुख्यमंत्री यांनी घोषणा केली. पण जर ते देशासाठी खेळत असतील, तर त्यांना पैशांची गरज काय? असा प्रश्न विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. एकीकडे शेतकरी आत्महत्या होत आहे. गेल्या चार महिन्यात 1068 शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. भाजप नेते त्यांना मदत करत नाही आणि खेळाडूंना 11 कोटी रुपये देतात, असेही वडेट्टीवार म्हणाले.
टीम इंडियाच्या खेळाडूंना 11 कोटी रुपये देण्याची गरज नव्हती. स्वतःची पाठ थोपटून घेण्यासाठी आणि छाप पाडण्यासाठी खेळाडूंना प्रोत्साहन दिले. कधीही अंथरून पाहून पाय पसरावे, पाय उघड्यावर पडतील तेव्हा दिसतील, असा टोलाही वडेट्टीवार यांनी लगावला.
तर दुसरीकडे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनीही सरकारवर निशाणा साधला आहे. सरकारी तिजोरीतून बक्षीस देण्याची गरज नाही. त्यांनाही गरज नाही. बीसीसीआयकडे खूप पैसे जमा आहेत. त्यातून त्यांना मानधन मिळते. क्रिकेटपटूंचा आदर करायला हवा, यात काहीही शंका नाही. पण त्यासाठी एवढा मोठा निधी राज्याच्या तिजोरीतून देण्यापक्षा मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या खिशातून द्यावा, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केली.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या टीकेला भाजप नेते प्रसाद लाड यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “विजय वडेट्टीवार जर म्हणत असतील की पैसे देणं चुकीचे आहे, तर ही त्यांची विकृती आहे. मी तर सोमवारी मागणी करणार की बाकीच्या चार खेडाळूंनाही सरकारने एक कोटी द्यावे आणि टीमच्या सर्व खेळाडूंचा सन्मान करावा”, असे प्रसाद लाड यांनी म्हटले. दरम्यान यामुळे आता वर्ल्ड कप विजेत्या टीमसाठी 11 कोटी रुपये पारितोषिक रक्कम घोषित केल्याने सत्ताधारी विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत.