पाच वर्षात ओबीसींचा कोणता प्रश्न सोडवला ते सांगा? वडेट्टीवारांचं फडणवीसांना शिवाजी पार्कवर खुल्या चर्चेचं आव्हान

| Updated on: Dec 13, 2020 | 6:35 PM

भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींच्या प्रश्नावरून राज्य सरकारला घेरलेलं असतानाच राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी त्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. (vijay wadettiwar slams devendra fadnavis over obc reservation)

पाच वर्षात ओबीसींचा कोणता प्रश्न सोडवला ते सांगा? वडेट्टीवारांचं फडणवीसांना शिवाजी पार्कवर खुल्या चर्चेचं आव्हान
Follow us on

मुंबई: भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींच्या प्रश्नावरून राज्य सरकारला घेरलेलं असतानाच राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी त्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. गेल्या पाच वर्षात फडणवीसांनी ओबीसींचा कोणता प्रश्न सोडवला ते सांगावं. मी ओपन चर्चा करायला तयार आहे. शिवाजी पार्कवर चर्चा होऊनच जाऊ द्या, असं आव्हान देतानाच ओबीसी समाज भाजपपासून दूर जात असल्याने त्यांना ओबीसींची कळवळा आल्याची टीका विजय वडेट्टीवार यांनी केली. (vijay wadettiwar slams devendra fadnavis over obc reservation)

‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी आज भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडलं. भाजप आज ओबीसींची बाजू घेत आहे. पण गेल्या पाच वर्षात भाजपने ओबीसींसाठी केवळ 60 कोटी रुपये दिले आहेत. तर मराठा समाजाच्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला पाचशे कोटी रुपये देण्यात आले आहेत. त्यामुळे भाजप कोणत्या ओबीसी प्रेमाच्या गप्पा मारत आहे? केवळ ओबीसी समाज भाजपपासून दूर जात असल्याने फडणवीसांची भाषा बदलली आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.

एकूण 50 कोटींचं बजेट आहे. त्यातील 15 कोटी महाज्योतीसाठी पडून आहेत. तीनशे कोटी सप्लीमेंटमध्ये घेण्याचं मान्य करण्यात आलंय. 200 कोटींची तरतूद महाज्योतीसाठी होणार आहे. भाजप सरकारने जाता जाता केवळ 60 कोटी रुपये ओबीसींना दिले. माझं चॅलेंज आहे. त्यांनी सिद्ध करावं. केंद्र सरकारने ओबीसींच्या स्कॉलरशीपसाठी 90 कोटी रुपये दिले आहेत. आठ जिल्ह्यातील आरक्षण कमी झालं होतं. ते का नाही देण्यात आलं? असा सवाल त्यांनी केला.

रिक्त जागाही भरल्या नाहीत

भाजप म्हणजे राम भरोसे हिंदू हॉटेल सारखं आहे. प्रभू रामाची भीती दाखवून ओबीसींची एकगठ्ठा मते घेतली. आम्हाला आतापर्यंत देवधर्मात गुरफटून ठेवलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेद्वारे दिलेले आमचे हक्कही आम्हाला दिले नाहीत. आमच्या अनेक जागा रिक्त आहेत. त्या भरल्या नाहीत. फडणवीसांनी गेल्या पाच वर्षात ओबीसींचा कोणता प्रश्न सोडवला ते सांगावं. मी ओपन चर्चा करायला तयार आहे. शिवाजी पार्कवर ही चर्चा होऊन जाऊ द्या. या खुल्या चर्चेसाठी मला बोलवा, मी यायला तयार आहे, असं आव्हानही त्यांनी दिलं. दिशाभूल करू नका. आमच्यावर अन्याय करू नका, असं सांगतानाच 52 टक्के ओबीसींवर अन्याय झाल्याचं मंत्री झाल्यावर मला कळलं, असंही ते म्हणाले.

संभाजीराजेंवर टीका

यावेळी त्यांनी मराठा आरक्षणावरूनही भाजपवर निशाणा साधला. ज्यांना भाजपने खासदार केलं ते लोक कोणती भाषा करत आहेत? खासदार संभाजीराजेंबरोबर असलेली लोकच ओबीसींमधला वाटा मागत आहेत, असा दावाही त्यांनी केला.

पवारांचं समर्थन

मोदी सरकारने केलेल्या शेतकरी विरोधी काळ्या कायद्याविरोधात सर्व प्रथम काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आवाज उठवला. काँग्रेसने सर्व प्रथम देशभर आंदोलन केलं. हरियाणा आणि पंजाबच्या शेतकऱ्यांनी तर दिल्ली दणाणून सोडली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही योग्य भूमिका घेतली असून त्यांचं आम्ही समर्थनच करतो. कृषी विधेयकं रद्द झालीच पाहिजे, असंही ते म्हणाले. (vijay wadettiwar slams devendra fadnavis over obc reservation)

 

संबंधित बातम्या:

मराठा आरक्षण, कोरोना ते शेतकरी; फडणवीसांचे ठाकरे सरकारला फटकारे; अधिवेशन वादळी ठरण्याचे संकेत

भाजपला ‘ओबीसीं’चा नारा देण्याची वेळ का आलीय?; वाचा राजकीय विश्लेषकांना काय वाटतं?

भुजबळ, वडेट्टीवार वातावरण खराब करत आहेत, सरकारला समाजात तेढ निर्माण करायची आहे का?; मेटेंचा सवाल

ओबीसी आरक्षणात वाटेकरी स्वीकारणार नाही; आरक्षणाला धक्का लावाल तर रस्त्यावर उतरू: देवेंद्र फडणवीस

(vijay wadettiwar slams devendra fadnavis over obc reservation)