मातोश्रीवर मोर्चा घेऊन जाणारच, परवानगी नाकारुन उद्धव ठाकरे रडीचा डाव खेळतायत: विनायक मेटे

| Updated on: Nov 07, 2020 | 11:17 AM

बाळासाहेबांच्या काळात लोकं मातोश्रीवर गाऱ्हाणं घेऊन जायची. मात्र, आज मुख्यमंत्री मातोश्रीवर कोणी येऊ नये म्हणून बंदोबस्त करतात. | Vinayak Mete

मातोश्रीवर मोर्चा घेऊन जाणारच, परवानगी नाकारुन उद्धव ठाकरे रडीचा डाव खेळतायत: विनायक मेटे
विनायक मेटे, अध्यक्ष, शिवसंग्राम संघटना
Follow us on

मुंबई: मातोश्रीवर मशाल मोर्चाला परवानगी नाकारुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रडीचा डाव खेळत आहेत. मात्र, आज कोणत्याही परिस्थितीत मातोश्रीवर मोर्चा जाणारच, असा निर्धार शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी व्यक्त केला आहे. (Vinayak Mete on Mashal morcha at matoshree)

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर आज संध्याकाळी मशाल मोर्चा काढण्यात येणार आहे. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तवर या मोर्चाला मातोश्रीवर जाण्यास मज्जाव करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर विनायक मेटे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी संवाद साधला. बाळासाहेबांच्या काळात लोकं मातोश्रीवर गाऱ्हाणं घेऊन जायची. मात्र, आज मुख्यमंत्री मातोश्रीवर कोणी येऊ नये म्हणून बंदोबस्त करतात. सरकारकडून मराठा मोर्चेकऱ्यांना नोटीस पाठवण्याचे षडयंत्र केले जातेय. हा रडीचा डाव असल्याची टीका, विनायक मेटे यांनी केली.

मुख्यमंत्र्यांना मराठा समाजाच्या भावना ऐकून घ्यायच्या आहे की नाही? मराठा समाजाला न्याय द्यायची की नाही, हा निर्णय अखेर मातोश्रीलाच घ्यायचा आहे. आता ठाकरे घराणे मराठा समाजाच्या पाठिशी आहे किंवा नाही, हे पाहायची वेळ आहे. त्यामुळे आम्ही मातोश्रीवर जात आहोत. कोणत्याही परिस्थितीत आज मशाल मोर्चा मातोश्रीवर जाणारच, असे विनायक मेटे यांनी सांगितले.

‘मराठा आरक्षण उपसमितीवरुन अशोक चव्हाणांना हटवा’

सरकारच्या नाकर्तेपणामुळेच मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाली आहे. येत्या काही दिवसांत वैद्यकीय अभ्यासक्रमासाठीची प्रवेशप्रक्रिया पार पडेल. तरीही अजून राज्य सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही. या सगळ्याला मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण हे जबाबदारी आहेत. त्यांच्या जागी दुसऱ्या कोणत्याही नेत्याची वर्णी लावावी, अशी मागणी विनायक मेटे यांनी केली.

‘मराठा मोर्चा दडपण्यासाठी सरकारचे प्रयत्न, घराखाली पोलीस उभे’

पोलिसांनी परवानगी नाकारली तरी आज कोणत्याही परिस्थितीत मराठा मशाल मोर्चा निघणारच, असा निर्धार विनायक मेटे यांनी व्यक्त केला. मराठा समाजातील नेत्यांना नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत. आमच्या घराखाली पोलीस उभे आहेत. सराकरने पोलिसांच्या माध्यमातून दडपशाही सुरु केली आहे. आणीबाणी पद्धतीने हे आंदोलन चिघळवण्याचे काम सुरु आहे. मात्र, आम्ही आंदोलन करण्यावर ठाम असल्याचे विनायक मेटे यांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

आक्रोश मोर्चा LIVE : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पंढरपूर ते मंत्रालय पायी दिंडी, मंदिर परिसरात मोठा फौजफाटा

Mashal March LIVE : मराठा क्रांती मोर्चा मशाल मार्च मातोश्रीवर धडकणार, पोलीस सतर्क, जादा फौजफाटा तैनात

मराठा क्रांती मशाल मार्चची नियमावली, शांततेत मोर्चा काढून मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार

(Vinayak Mete on Mashal morcha at matoshree)