मुंबई : सिंधुदुर्गाच्या वैभववाडी नगरपंचायतमधील सहा भाजप नगरसेवकांनी मंगळवारी (9 फेब्रुवारी) रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समक्ष शिवेसेनेत प्रवेश केला. सहा नगरसेवकांना शिवसेनेत सामील केल्याने भाजपला हा मोठा झटका बसला आहे. दोन दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आले होते. त्यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली होती. त्या टीकेला शिवसेनेने नगरसेवकांना शिवसेनेत सामील करुन उत्तर दिले. आता याच मुद्द्यावरुन भाजप आणि शिवसेनेत राजकीय घमासान सुरु आहे (Vinayak Raut slams Chandrakant Patil).
अमित शाहांच्या पायगुणाने सरकार येणार, भाजपचा दावा
“सिंधुदुर्गातल्या वैभववाडीतले 6 नगरसेवक अमित शाहांच्या पायगुणानं गेले नाही. पण ते नगरसेवक गेले म्हणजे भाजपचं पुन्हा सरकार येणारच नाही, असं नाही. तर शाहांच्या पायगुणानं सरकार येणारच”, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले. त्यांच्या वक्तव्याला शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे (Vinayak Raut slams Chandrakant Patil).
विनायक राऊत काय म्हणाले?
“गिर गये तो भी टांग उपर, असं भाजपच्या प्रदेशाध्यक्षांचं आहे. वैभववाडीत भाजप खासदार नारायण राणे पुरस्कृत सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. आमदार नितेश राणे आणि त्यांच्या कुटुंबीयांना कंटाळून हे सगळे नगरसेवक शिवसेनेमध्ये दाखल झाले आहेत. भविष्यात येणारी जी निवडणूक आहे या सर्व निवडणुकांमध्ये शिवसेना आणि महाविकासआघाडी ही स्वतःची प्रचंड ताकद दाखवून देईल”, अशी प्रतिक्रिया विनायक राऊत यांनी दिली.
पुण्यातील बांधकाम- हॉटेल व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या पुण्यातील ABIL हाऊस या कार्यालयावर ईडीने धाड टाकली आहे. फेमा कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे. ईडीच्या या कारवाईवरदेखील विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.
“केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर सध्याची ईडी चालते का? हाच आता सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न आहे. त्याला उत्तरही मिळालेलं आहे. होय, केंद्र शासनाने स्वतःच्या विरोधकांना चेपण्यासाठी ईडी संस्थेचा दुरुपयोग चालू केलेला आहे. महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत एकूण 42 लोकांवर कारवाई झाली. मात्र त्यातून काहीही निष्पन्न झालेलं नाही”, असं विनायक राऊत म्हणाले.
संबंधित बातमी : ‘कितीही वल्गना केल्या तरी शिवसेना संपणार नाही, शिवसेना समोरच्याला संपवेल’, उदय सामंतांचं भाजपला उत्तर