सिंधुदुर्ग : “केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) खोटारडे आणि विश्वासघातकी आहेत. शाहांच्या हटवादीपणामुळे सतरा ते अठरा पक्ष एनडीएतून बाहेर पडले. भाजप आणि आणखी एक पक्ष सोडला, तर सर्वच पक्ष भाजपपासून दुरावले आहेत. त्यामुळे विश्वासघातकी नेमकं कोण, हे आता दिसून येत आहे” अशा शब्दात शिवसेना खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी शाहांच्या टीकेला उत्तर दिलं. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हट्टामुळे युती तुटल्याचं भाजपच्या दिल्लीश्वरांनाही मान्य असल्याचं विनायक राऊत म्हणाले. (Vinayak Raut slams Devendra Fadnavis and Amit Shah)
“शाहांसाठी खोली, देशासाठी दैवताचं मंदिर”
“केवळ भाजपच्या विश्वासघातकीपणामुळे शिवसेनेला दूर जावं लागलं. अमित शाह ज्या बंद खोलीत चर्चा झाली म्हणतात, ती त्यांच्या दृष्टीने खोली असेल, मात्र शिवसेना आणि संपूर्ण देशासाठी एका दैवताचं मंदिर आहे. त्याच मंदिरातील दैवताने अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी एवढा मोठा आशिर्वाद ठेवला होता, म्हणून देशाला आज नरेंद्र मोदी आणि अमित शाह दिसत आहेत” असा टोला विनायक राऊतांनी लगावला.
“शाह-राणेंची युती लाईफ टाईम टिको”
“राज्यसभेचे खासदार नारायण राणे (Narayan Rane) आणि अमित शाह यांच्यासारख्या समविचारी लोकांची युती झाली असेल. ही युती लाईफटाईम टिको अशी अपेक्षा आहे. भाजपकडून खोटारडेपणाचं राजकारण सुरु आहे. केंद्रात जी सत्ता आली आहे ती निष्ठूरपणे राबवायची हा त्यांचा एकमेव धंदा आहे. जो विरोधात गेला त्याच्या पाठी ईडी लावायची” अशी टीकाही राऊतांनी केली.
“फडणवीसांचे लाड पुरवण्यासाठी वारंवार खोटं”
“खोटं बोल पण रेटून बोल याच कारणामुळे संपूर्ण एनडीए, जो अटलबिहारी वाजपेयी यांनी स्थापन केला, तो आज यांच्या खोटारडेपणामुळे विखुरला. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे लाड पुरवण्यासाठी तुम्ही वारंवार खोटं बोलत होता. मात्र भाजपमधील अनेक लोकांना आजही वाटते की त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी घोडचूक केली. स्वतःच्या फायद्यासाठी युतीचा फायदा करुन घेतला. केवळ देवेंद्र फडणवीस यांच्या हट्टापायी युती तुटली, हे आता दिल्लीतील भाजपचे नेते मान्य करत आहेत” असा दावा विनायक राऊतांनी केला. (Vinayak Raut slams Devendra Fadnavis and Amit Shah)
“राणेंच्या हॉस्पिटलला शिवसेनेने कदापिही खो घालण्याचा प्रयत्न केला नाही, उलट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे जेव्हा फाईल आली, तेव्हा तातडीने मंजुरी देण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलं. जो प्रस्ताव रखडला होता तो राणेंच्या कंगालपणामुळे” असा घणाघातही विनायक राऊत यांनी केला.
“राणेंनी तीन वेळा फोन केल्याने मुख्यमंत्र्यांच्या मनाचा मोठेपणा”
“राणेंना खर बोलल्याशिवाय पर्याय नव्हता. राणेंनी एकदा नव्हे तर तीन वेळा मुख्यमंत्र्यांना फोन केला. तीन-तीन वेळा फोन केला म्हणून मुख्यमंत्र्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून राणेंची विचारपूस केली आणि काय काम आहे ते विचारून घेतलं. नारायण राणे अमित शाहांना खुश करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शिव्या द्यायचं काम करतात, राणेंचा तो परीपाट आहे” अशा शब्दात खासदार विनायक राऊत यांनी घणाघाती टीका केली.
संबंधित बातम्या :
नारायण राणेंना केंद्रात बढती मिळणार?; अमित शाहांच्या कोकण दौऱ्यामुळे जोरदार चर्चा
(Vinayak Raut slams Devendra Fadnavis and Amit Shah)