मुंबई : महापालिका सार्वत्रिक निवडणुकां (Municipal General Elections)साठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या (Voter List) 13 ऑगस्ट 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यावर 22 ऑगस्ट 2022 पर्यंत हरकती व सूचना (Objections and Suggestions) दाखल करता येतील. यामध्ये औरंगाबाद, लातूर, परभणी, चंद्रपूर, भिवंडी-निजामपूर, मालेगाव, पनवेल, मीरा-भाईंदर व नांदेड-वाघाळा या महानगरपालिकांचा समावेश असेल. भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या तसेच 31 मे 2022 रोजी अस्तित्वात आलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. या मतदार याद्या प्रभागनिहाय विभाजित केल्यानंतर 13 ऑगस्ट 2022 रोजी प्रारुप स्वरुपात प्रसिद्ध केल्या जातील. त्यावर 22 ऑगस्ट 2022 पर्यंत संबंधित ठिकाणी हरकती व सूचना दाखल करता येतील.
प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या 2 सप्टेंबर 2022 रोजी प्रसिद्ध केल्या जातील. प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच प्रभागनिहाय मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. हरकती व सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणाऱ्या चुका, मतदाराचा चुकून प्रभाग बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदी संदर्भातील दुरूस्त्या करण्यात येतात.
ठाणे महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, (महिला) व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्याकरीता सोडत काढणे, तसेच आरक्षणाचे प्रारूप प्रसिध्द करण्यासाठी कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. ठाणे महापालिकेच्या डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे शुक्रवार 29 ऑगस्ट, 2022 रोजी सकाळी 11 वाजता आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. तसेच शनिवार दिनांक 30 जुलै, 2022 रोजी आरक्षणाचे प्रारुप प्रसिध्द करण्यात येणार आहे. तर 30 जुलै, 2022 ते 2 ऑगस्ट, 2022 (दुपारी 3 वाजेपर्यंत) आरक्षणाबाबत हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी असून हरकत व सूचना महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे निवडणूक कार्यालय अथवा संबंधित प्रभाग कार्यालयाचे मुख्यालय येथे सादर कराव्यात. (Ward-wise draft voter lists for municipal general elections will be released on August 13)