मुंबई: आम्ही अपक्षांना पाठिंबा देणार नाही. मग तो कोणीही असो. आम्ही दोन जागा लढवणार. दुसरा उमेदवार हा शिवसेनेचाच असेल आणि शिवसेनेचाच उमेदवार निवडून येईल, असं शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी स्पष्ट केलं. शिवसेनेने (shivsena) आज अत्यंत कडक भूमिका घेत संभाजीराजेंना पाठिंबा देणारच नसल्याचं स्पष्ट केलं. संभाजीराजेंनी (Sambhaji Chhatrapati ) एकतर शिवसेनेत यावं आणि राज्यसभेवर जावं. आम्हाला आमचा राज्यसभेत एक खासदार वाढवायचा आहे. आमची मतं आहेत. ती अपक्षांना आम्ही कशी देणार? असा सवालच संजय राऊत यांनी केला आहे. त्यामुळे संभाजी छत्रपती यांची चांगलीच कोंडी झाली आहे. शिवसेनेच्या भूमिकेत कोणताही बदल न झाल्याने संभाजी राजे आता काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. संभाजीराजे या संदर्भात येत्या एक दोन दिवसात आपली भूमिका जाहीरपणे स्पष्ट करण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
संजय राऊत यांनी आज मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं स्पष्ट केलं. आम्हाला संभाजी छत्रपती यांचा प्रस्ताव आला नव्हता. शिवसेना दोन जागा लढवणार आहे. शिवसेनेने दोन जागा लढवणं हा काही राजकीय अपराध नाही. शिवसेना हा राजकीय पक्ष आहे. गेली अनेक वर्ष राजकारणात आहे. महाराष्ट्रात आमचा मुख्यमंत्री आहे. अशावेळेला सहा जागांची निवडणूक होत आहे. त्यातील दोन जागा आम्ही लढत आहोत. दोन्ही ठिकाणी उमेदवार देऊ आणि निवडून आणू, असं संजय राऊत म्हणाले.
कोल्हापूरचे संभाजी राजे यांनी अपक्ष लढण्याची घोषणा केली आहे. ज्या अर्थी एखादा उमेदवार मी लढणार असे जाहीरपणे सांगतो तेव्हा मला वाटतं तेव्हा त्यांनी निवडून येणाऱ्या मतांची व्यवस्था केलेली असते. किती मते लागतात 42. ज्या अर्थी राजे संभाजी छत्रपती यांनी निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. त्या अर्थी त्यांनी 42 मतांची बेगमी केली असणार. त्यांना कुणी तरी पाठिंबा दिला असणार. ते अपक्षण लढणार म्हणत आहेत. मग अशावेळी आम्ही त्यात पडणं गरजेचं नाही. ते स्वतंत्र व्यक्तीमत्व आहे, असं त्यांनी सांगितलं.
पण त्यांच्याकडे मतं नाही हे लक्षात येतं. त्यांनी आमच्याकडे मते मागितली. आम्ही कसे मतं देणार? आम्हाला शिवसेनेचा उमेदवार निवडून आणायचा आहे. अपक्ष नाही. आम्ही अपक्षांना पाठिंबा देणार नाही. मग ते कोणीही असो. शिवसेनेचा उमेदवार नाही. शिवसेनेच या, शिवसेनेचे उमदेवार व्हा, असं आम्ही त्यांना सांगितलं. प्रस्ताव दिला नाही. राज्यसभेत आम्हाला शिवसेनेचा एक खासदार वाढवायचा आहे. तुम्ही एक पाऊल पुढे या, आम्ही दोन पाऊल मागे जाऊ. तुम्ही छत्रपती आहात. अर्थात निर्णय त्यांच्या हातात आहे. पण कोणत्याही परिस्थितीत दोन उमेदवार शिवसेनेचेच निवडून जातील. ते पक्के शिवसैनिक असतील. ये मेरे मनकी बात नही. उद्धव ठाकरे सांगत आहेत तेच सांगतोय, असंही त्यांनी सांगितलं.