मुंबई | 25 जानेवारी 2024 : ठाणे जिल्ह्यामध्ये कधी कधी गुंडगिरी डोकं वर काढते. कधी कधी कोण दहशत माजवतं. कोण दादागिरी करतं? कोण समाजातल्या गरीब वर्गाला जाणून बुजून त्रास देण्याचा प्रयत्न करतं. तशा प्रकारच्या घटना होता कामा नये. म्हणून आमच्या पोलीसदलाने पण डोळ्यात तेल घालून सर्वसामान्य माणसाचं संरक्षण केलं पाहिजे. अशा प्रकारचे आदेश देखील मी उपमुख्यमंत्री या नात्याने देतो असे अजित पवार म्हणाले होते. मात्र अजित पवार यांच्या याच वक्तव्यावरून आता विरोधकांनी त्यांना घेरलंय.
अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार आणि गुंड गजानन मारणे यांच्या भेटीचा फोटो सोशल मिडीयावर आलाय. ज्यामध्ये पार्थ पवार, अजित पवारांचे सहकारी आणि गुंड गजा मारणे दिसत आहेत. याच फोटोवरून विरोधकांनी अजित पवार यांना टार्गेट केलंय.
अजित पवार म्हणाले ठाणे जिल्ह्यामध्ये कधी कधी गुंडगिरी डोकं वर काढते. कधी कधी कोण दहशत माजवतं. पण, तुम्ही पालकमंत्री असलेल्या पुण्यात काय घडलं? त्या शरद मोहोळ यांना गोळी मारली. भर दिवसा त्याचा खून झाला अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केलीय.
राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) नेते एकनाथ खडसे यांनीही ‘अजितदादा कायदा सुव्यवस्थेवर बोलणं म्हणजे हाच मोठा विनोद आहे असा टोला लगावला. अजितदादा पवार जर कायदा सुव्यवस्थेचं समर्थन करत असेल. तर, मग त्यांचे जे चिरंजीव पार्थ पवार आहेत ते गजानन मारणे यांची भेट घेतात. हा गजानन मारणे त्या टोळीचा प्रमुख आहे असे खडसे म्हणाले.
पुणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर कायदा सुव्यवस्थेचा भंग केला जातो. ज्याच्यावर गंभीर असे सहा गुन्हे दाखल आहे. अशांना भेटणं योग्य नाही आहे किमान अजित पवारांनी आपल्या मुलाला तरी समजवलं पाहिजे अशी टीकाही खडसे यांनी केलीय.
दरम्यान, अजित पवार गटाच्या प्रवक्त्या यांनी मात्र या भेटीचे समर्थन केलंय. अजितदादा कायदा आणि सुव्यवस्थेसाठी कायम आग्रही असतात. पार्थ पवार स्थानिक लोकप्रतिनिधींकडे गेल्यानंतर ही भेट झाली. असा बचाव त्यांनी केलाय.
सौ. जयश्री गजानन मारणे या गजानन मारणे यांच्या पत्नी आहेत. त्यांनी कोथरूड भागात लोकप्रतिनिधीत्व भूषवलेलं आहे. त्यामुळे आपल्या लोकप्रतिनिधींच्या घरी भेट देण्याचे निमित्त होतं. मुळामध्ये गजानन मारणे यांच्या किती केसेस होत्या. ज्या काही केसेस होत्या त्यातून त्यांची निर्दोष मुक्तता झालेली आहे. त्याच्यामुळे कुठल्यातरी गुंडाला भेटले, भाईला भेटले असा जो चुकीचा अर्थ पसरवण्यात येतोय तो अत्यंत चुकीचा आहे अशी सारवासारव त्यांनी केलीय.