चिक्कार घडामोडी, खल आणि जागावाटप, मविआ आणि महायुतीचं नेमकं काय ठरलं?

| Updated on: Oct 02, 2024 | 9:13 PM

मुंबई दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत स्वतंत्र बैठक घेतली. या बैठकीत जागावाटपाबाबत चर्चा झाली. तर महाविकास आघाडीचंदेखील जागा वाटपाचं ठरल्याचं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी सांगितलं आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत कोण किती जागांवर लढू शकतं? याबाबत सूत्रांकडून महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

चिक्कार घडामोडी, खल आणि जागावाटप, मविआ आणि महायुतीचं नेमकं काय ठरलं?
प्रातिनिधिक फोटो
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या बैठका अंतिम टप्प्यात आल्यात आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 3 वेगवेगळ्या बैठका घेतल्या आहेत. रात्री आधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सागर बंगल्यावर अमित शाहांची बैठक झाली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतही अमित शाहांची जवळपास एक तास बैठक झाली. तसेच दिल्लीला रवाना होण्याआधी ‘सह्याद्री’ अतिथीगृहावर फडणवीसांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुनील तटकरेंसोबत अमित शाहांनी बैठक घेतली. म्हणजेच जागावाटपाची सूत्र अमित शाहांनीच हाती घेतल्याचं दिसत आहे. या बैठकीतून एक फॉर्म्युला समोर आल्याची चर्चा आहे. ज्यावर शिक्कामोर्तब होऊ शकते. भाजप 155 ते 160 जागा लढण्याची शक्यता आहे. 150च्या खाली लढायचं नाही, असं भाजपच्या नेतृत्वाने ठरवल्याचं दिसत आहे. भाजपने 155 जागा घेतल्यास शिंदेंच्या शिवसेनेला 73 ते 75, जागा तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 60-62 जागा मिळू शकतात.

एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांच्या बैठकीत चर्चा काय?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत अमित शाहांची जी बैठक झाली त्यात शिंदेंनी महाराष्ट्रात महायुतीचंच सरकार आणू, अशी ग्वाही दिल्याची माहिती आहे. त्याचवेळी लोकसभा निवडणुकीप्रमाणे जागा वाटप करायला आणि उमेदवारांची नावं घोषित करायला उशीर नको, अशी विनंतीही एकनाथ शिंदेंनी अमित शाह यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्री शिंदेंनी अपेक्षित असलेल्या जागा आणि त्या कशा जिंकू शकतो याची माहिती शाहांना दिली. लाडकी बहीण योजनेसह इतर योजना लोकापर्यंत पोहोचल्या आहेत, त्यावर लक्ष केंद्रीत करायला हवं, असं शिंदेंनी म्हटलं आहे.

दरम्यान, जागावाटपावर समन्वयानं मार्ग काढू, असा विश्वास अमित शाहांनी शिंदेंना दिला. आपसातील मतभेद विसरुन कुटुंबाप्रमाणं महायुती म्हणून एकत्र लढा असा सल्लाही त्यांनी शिंदेंना दिला. मात्र अमित शाहांसोबत शिंदे आणि अजित पवारांच्या ज्या बैठका झाल्या त्यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी निशाणा साधलाय आहे. शिंदे आणि अजित पवारांचे अमित शाह बॉस आहेत, त्यामुळे मालकाला भेटावंच लागेल, अशी टीका राऊतांनी केली.

महाविकास आघाडीचा फॉर्म्युला काय?

दुसरीकडे महाविकास आघाडीच्या बैठकांच्या सिलसिल्यानंतर त्यांचाही जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याची माहिती आहे. काँग्रेसला 100-105 जागा मिळण्याची शक्यता आहे, म्हणजेच काँग्रेस अधिक जागांवर लढू शकते. ठाकरेंच्या शिवसेनेला 95-100 जागा मिळू शकतात आणि शरद पवारांची राष्ट्रवादी 80-85 जागांवर लढू शकते.

महाविकास आघाडीबद्दल बोलायचं झालं तर, उद्धव ठाकरेंच्या विधानसभा निहाय बैठका संपल्या आहेत. उद्धव ठाकरेंच्या मॅरेथॉन बैठकीत 100-105 जागांवर एकमत झाल्याची माहिती आहे. महाविकास आघाडीत विद्यमान आमदारांना पुन्हा त्याच मतदारसंघात तिकीट मिळणार आहे. ज्या मतदारसंघात एका पेक्षा अधिक इच्छुक आहेत, त्यावर 2 दिवसांत वरिष्ठ स्तरावर तोडगा काढण्यात येईल. दसऱ्याला महाविकास आघाडीची यादी येईल, अशी माहिती शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीच्या छोट्या घटकपक्षांसोबतही बैठका सुरु झाल्या आहेत, ज्यात समाजवादी पार्टीने 12 जागांची मागणी केली आहे. येत्या 10 ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अंतिम तोडगा काढण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडे 8 दिवस आहेत. दसऱ्याच्याच मुहूर्तावर यादी जाहीर करण्याचा मानस दोघांचाही आहे.