निलेश डहाट, टीव्ही 9 मराठी, प्रतिनिधी, नागपूर | 15 डिसेंबर 2023 : बीड शहरात 30 ऑक्टोबर रोजी झालेल्या हिंसाचारात सात ते आठ तास आमच्या शहर अक्षरश: तुटत होते, जळत होते. रात्री नऊ वाजेपर्यंत हा प्रकार सुरु होता. आमचे घर सुद्धा जळाले. आमचं कुटुंब सुदैवाने वाचले. एखादी घटना तासभरात झाली तर पोलिसांना पोहचायला उशीर झाला हे मान्य करू शकतो. परंतू सात ते आठ तास हिंसाचार सुरु होता. विशेष म्हणजे माझ्या घराचा रस्ता ओलांडल्यावर पोलिस मुख्यालय आहे. तेथे रिझर्व्ह फोर्स असतो, दंगल नियंत्रण पथक असते. परंतू मदत पोहचली नाही. जे काही 100 ते 200 लोक जमावात होते. ते संपूर्ण सुसज्ज आणि प्रशिक्षित होते असे आपल्यावर घडलेल्या प्रसंगाचा थरारक अनुभव राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षिरसागर सांगत होते.
मराठा आंदोलनापैकी या जमावाचा काही संबंध नव्हता. ते सर्व प्रशिक्षित गुन्हेगार होते. ज्या पद्धतीने ते पेट्रोल बॉम्ब वापरत होते. फॉस्फरस वापरत होते. दोन वाजल्यापासून ते नऊ वाजेपर्यंत त्यांनी संपूर्ण शहराची रेकी केली होती. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी ते कोडवर्ड वापरत होते. जमावाच्या आजूबाजूला पोलिस उभे असल्याचे फूटेज आपल्याकडे असल्याचे संदीप क्षीरसागर यांनी सांगितले. गृहमंत्री साहेबांनी सांगितले की 5000 चा जमाव होता. पोलिसांच्या कम्प्लेंटमध्ये हजाराचा जमाव म्हटले आहे. या गुंडांनी हिंसा सुरु करताच पोलिसांनी कारवाई केली असती तर ही परिस्थिती आमच्या शहरावर आली नसती असे संदीप क्षीरसागर यांनी सांगितले.
बीड शहरातील दुकान, पक्ष कार्यालयं, आणि घरावर चालून आलेला जमाव तोडफोडीनंतर कोणाला तरी फोन करून सांगायचे की इकडचं काम झालं आहे. आता या नंबरवरती जायचं आहे असे ते सांगत होते. सात ते आठ तास जिल्ह्याचे ठिकाण जळत होते. पोलीस तिथे असतानाही कोणी कारवाई केली नाही. रिझर्व्ह पोलीस नसल्याचे कारण पोलिस देत आहेत. परंतू आजूबाजूच्या जिल्ह्यातून फोर्स का आणला नाही असा ? सवाल क्षीरसागर यांनी केला आहे.
मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलनात लाखा लाखांचे मोर्चे निघाले. रस्त्यावर लाखोंचा जमाव उतरला तरी एक खडाही कोठे कुणाला लागला नाही. परंतू या प्रकरणात महाराष्ट्रात ज्या प्रकारे चित्र रंगवले जात आहे ते योग्य नाही. गावगुंडांनी अत्यंत नियोजित पद्धतीने हा हिंसाचार केला आहे. याचा अर्थ समाजा – समाजामध्ये तणाव निर्माण करण्याचा पद्धतशीर हेतू यामागे आहे. या प्रकरणातील जे आरोपी आहेत. त्यांची नीट चौकशी केली तर या मागचा मास्टरमाईंड बाहेर येऊन 100 टक्के हे काय प्रकरण आहे ते महाराष्ट्राला कळेल असेही संदीप क्षीरसागर यांनी सांगितले.