Explain : विधानसभा निवडणुकीत हरियाणासारखं महाराष्ट्रात होईल का? ‘हो’, कसं ते समजून घ्या 3 पॉईंटमधून

| Updated on: Oct 17, 2024 | 11:20 AM

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालाने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. राजकीय पंडितांबरोबर एक्झिट पोलचे आकडेही चुकले. हे असं कसं घडू शकतं? असा प्रश्न काँग्रेससह इंडिया आघाडीमधील पक्षांना पडला आहे. आता जे हरियाणात झालं, ते महाराष्ट्रात होईल का? असा प्रश्नही काहींच्या मनात आहे. त्याचं उत्तर 'हो', आहे, कसं ते समजून घ्या.

Explain : विधानसभा निवडणुकीत हरियाणासारखं महाराष्ट्रात होईल का? हो, कसं ते समजून घ्या 3 पॉईंटमधून
Mahayuti vs Mva
Follow us on

लोकसभेनंतर हरियाणा, जम्मू-काश्मीरची विधानसभा निवडणूक झाली. त्यानंतर आता भाजपा आणि काँग्रेसची मोठी परीक्षा महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात येत्या 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणूक होणार आहे. भाजपा महायुती म्हणून या निवडणुकीला सामोरी जाणार आहे. हरियाणा सारखाच भाजपाला इथे प्रस्थापित सरकार विरोधी लाटेचा सामना करावा लागणार आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपा महायुतीला 17 जागा मिळाल्या. काँग्रेस, शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटाच्या इंडिया म्हणजेच मविआ आघाडीने 30 जागा जिंकल्या. लोकसभेला महायुती आणि मविआला जवळपास 43 टक्के मतदान झालं होतं. 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील राजकीय चित्र पूर्णपणे बदलून गेलं आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन प्रादेशिक पक्ष फुटले. एक गट सत्तेत आणि दुसरा विरोधात अशी स्थिती आहे. त्यामुळे 2024 च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राची जनता काय कौल देते? याची सगळ्यांनाच उत्सुक्ता आहे.

हरियाणाची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होणार का? असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. हरियाणामध्ये मागच्या 10 वर्षांपासून भाजपाच सरकार होतं. यावेळी सत्ता बदल होणार, काँग्रेसच सरकार येणार? असा अनेकांना विश्वास होता. एक्झिट पोलने सुद्धा तसाच कौल दिला होता. पण प्रत्यक्षात घडलं उलटच. निकालच्या दिवशी हरियाणात भाजपाने पूर्ण बहुमताने पुन्हा सत्ता मिळवली. अनेकांना अजूनही यावर विश्वास बसत नाहीय. हे कसं घडलं? हरियाणात लोकसभेच्या 10 जागा आहेत. भाजपाने 5 तर काँग्रेसने 5 जागा जिंकलेल्या. प्रस्थापितांविरोधातील लाटेमुळे सत्ताबदल होईल हा अनेकांदा अंदाज चुकला़. महाराष्ट्रातही हरियाणासारखच घडणार का? हा आता अनेकांच्या मनात प्रश्न आहे.

महाविकास आघाडीचं काय चुकतय?

काँग्रेस मविआमधील मोठा पक्ष आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी देश पातळीवर इंडिया आघाडी म्हणून ओळखली जाते. काँग्रेससमोर आघाडी धर्म पाळताना अनेक आव्हान आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीमुळे जागावाटप अधिकच किचकट बनलं आहे.

मविआमधील उद्धव ठाकरे गटाने विधानसभा निवडणुकीआधी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा, अशी मागणी केली होती. त्या मागणीवर मविआमधील मतभिन्नता स्पष्ट झाली होती. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आपण मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करु, असं काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाच मत होतं.

मविआमध्ये काँग्रेस स्वत:ला मोठा भाऊ मानते. काँग्रेसमधल्या काही नेत्यांनी मुख्यमंत्रीपदाची इच्छा व्यक्त केली आहे. काँग्रेस मोठा पक्ष असल्याने मुख्यमंत्रीपदावर अप्रत्यक्षपणे काँग्रेसकडून दावा सांगण्यात आला आहे.

हरियाणाच्या निकालाचा काँग्रेसला महाराष्ट्रातही फटका बसणार आहे. या निकालामुळे काँग्रेसची महाविकास आघाडीमधील बार्गेनिंगची पावर कमी झाली आहे. मुख्यमंत्रीपद, मोठा भाऊ, लहान भाऊ यावरुन असलेला विसंवाद महाविकास आघाडीला महाराष्ट्रात भारी पडू शकतो. हरियाणा विधानसभा निवडणुकीत झालेल्या चुकांमधून धडा घेऊन काँग्रेसला वेळीच योग्य रणनिती आखावी लागेल.

लोकसभेच्या पराभवातून महायुतीने काय धडा घेतला?

लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवातून महायुतीने धडा घेतल्याच दिसत आहे. लोकसभा निवडणुकीत महायुती संविधानाच्या नरेटिव्ह समोर कमी पडली होती. महायुती सरकारने आता त्यांनी केलेल्या कामावर फोकस केला आहे. महायुतीने लाडकी बहिण आणि अन्य योजना आणल्या. त्यामुळे मतदारांना थेट कसा फायदा होतोय, याचा प्रचार सुरु केला आहे. महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1500 रुपये जमा करण्याची लाडकी बहिण योजना गेमचेंजर ठरावी, यासाठी महायुतीकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. विरोधी पक्षावर म्हणजे मविआवर टीका करताना त्यांच्यापेक्षा आपण किती चांगलं काम केलय हे मतदारांच्या मनावर ठासवण्याचा प्रयत्न होतोय. मुंबई सारख्या शहरात अटल सेतू, कोस्ट रोड, मेट्रो प्रकल्प हे झालेले बदल दिसतायत. सरकारने विकासात्मक काय काम केली, त्याचा जोरदार प्रचार सुरु आहे. लोकसभेला मविआने जे नरेटिव सेट केलेलं, ते तोडण्यात महायुती यशस्वी होताना दिसतेय.

…म्हणून हरियाणासारखं महाराष्ट्रात घडू शकतं

लोकसभेला काँग्रेसने संविधान धोक्यात असल्याचा मुद्दा लावून धरला होता. त्या आधारावर इंडिया आघाडीला दलित आणि मुस्लिमांची मतं आपल्याकडे वळवता आली. हरियाणा विधानसभा निवडणुकीत संविधानाचा मुद्दा चालला नाही. हरियाणात काँग्रेसने एकगठ्ठा जाट मतांवर लक्ष केंद्रीत केलं. त्यावेळी भाजपाने विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून बिगर जाट मतांना एकत्र करण्यावर भर दिला. महाराष्ट्रातही भाजपा अशाच प्रकारे सोशल इंजिनिअरींगवर भर देण्याची खेळी करु शकते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने 105 जागा जिंकल्या होत्या. तितक्या जागा जिंकणं भाजपासाठी आता सोपं नाहीय. पण शिस्तबद्ध निवडणूक लढवण्याचं नियोजन आणि सामाजिक समीकरण साधण्याच भाजपाच यश यामुळे हरियाणासारख महाराष्ट्रात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.