मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि नंतर तो मागे घेतला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय तणाव निवळला आहे. मात्र, शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा का दिला? याचं गूढ अजूनही उकलेलं नाही. पवारांनी राजीनामा का दिला यावर अजूनही खल सुरूच आहे. राजकारणाचा एक मोठा पल्ला पार पाडल्यानंतर कुठे तरी थांबलं पाहिजे, असं वाटल्याने आपण पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचं शरद पवार यांनी कालच सांगितलं. मात्र, दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून शरद पवार यांच्या राजीनाम्याचं भलतंच कारण सांगण्यात आलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पवार यांच्या राजीनाम्याची चर्चा रंगली आहे.
शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपच्या तंबूत न्यावा आणि आपल्या सहकाऱ्यांना ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सच्या छळातून सुटका करावी, असा राष्ट्रवादीतील एका गटाचा आग्रह होता. पण शरद पवारांनी त्याला नकार दिला. उलट पक्षाच्या प्रमुख पदावरून शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केली. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांना विजेचा झटका बसला, असं दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून म्हटलं आहे. राष्ट्रवादीचा एक गट भाजपसोबत सोयरीक जुळवण्यास उत्सुक होता म्हणूनच पवारांना राजीनाम्याचं हत्यार उपसावं लागल्याचं अग्रलेखातून सूचवण्यात आलं आहे.
नवा अध्यक्ष नेमण्यासाठी शरद पवार यांनी एक कार्यकारिणी नेमली. या कार्यकारिणीत त्यांनी भाजपमध्ये जाण्याचे संधान ज्यांनी बांधले होते, त्यातील बऱ्याच जणांना घेतले. पण कार्यकर्त्यांच्या रेट्यामुळे या कार्यकारिणीतील नेत्यांनाही पवारांकडेच अध्यक्षपद सोपवावे लागल्याचं अग्रलेखात म्हटलं आहे. तिसऱ्या अंकाची घंटा वाजण्याआधीच पवारांनी नाटकाचा पडदा पाडल्याचं सूचक विधानही अग्रलेखातून करण्यात आलं आहे.
पवारांच्या निर्णयाने सर्वांनाच हायसे वाटले. पण या निमित्ताने पक्ष कोठे आहे आणि आपल्याभोवती फिरणाऱ्यांची मने नेमकी कोठे फिरत आहेत, याचा अंदाजही पवार यांनी घेतला. राष्ट्रवादी सोडून ज्यांना जायचे त्यांनी जावे. त्यांना थांबवणार नाही, असं पवार यांनी सांगितल्याचं सांगतानाच राष्ट्रवादीतून जे जाणार होते ते आता तूर्तास थांबल्याचंही नमूद करण्यात आलं आहे.
शरद पवार यांच्या खेळीने भाजपचे लॉजिंग बोर्डिंग रिकामेच राहिले. कितीही मोठा सरदार असो लोकच त्याला संपवतात. शिवसेना सोडून गेले त्यांची अवस्था उकिरड्यावरील बेवारस कुत्र्यांपेक्षेही वाईट आहे. भाजपकडे नैतिकता औषधालाही शिल्लक नाही. लोकशाही मार्गाने निवडणुका जिंकण्याची भाजपची कुवत नाही. केंद्रीय संस्थाचा वापर करून ते राजकारण करत आहेत.
शरद पवार, उद्धव ठाकरे, लालूप्रसाद यादव, केसी चंद्रशेखर राव, ममता बॅनर्जी आणि स्टॅलिन हे नेते लढायला उतरले आहेत. कार्यकर्तेच लढत असतात. बॅगा भरून जे निघाले त्यांच्यावर पक्ष उभा नसतो. सर्वच पक्षातील डरपोक सरदारांनी स्वतंत्र पक्ष स्थापन करावा. म्हणजे लोकांना कळेल खरे मर्द कोण? असा सवालही त्यांनी केला आहे.