किशोर पाटील, Tv9 प्रतिनिधी, जळगाव : जळगावच्या जामनेरमधील भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप खोपडे यांनी दोन दिवसांपूर्वी भाजपचा राजीनामा दिला. ते शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याने जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात चर्चा रंगली आहे. दिलीप खोपडे यांच्या शरद पवार गटातील प्रवेशामुळे त्यांना जामनेर मतदारसंघातून उमेदवारी देऊन शरद पवार हे गिरीश महाजन यांच्याविरुद्ध मोठा डाव खेळणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान मराठा चेहरा असलेले दिलीप खोपडे यांच्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत जामनेर विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. दरम्यान, 16 सप्टेंबरला व्हायरल झालेल्या ट्विटरच्या ट्वीटच्या माध्यमातून दिलीप खोपडे हे शरद पवार गटाच्या वाटेवर असून त्यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याचे समोर आलं. या चर्चेवर दिलीप खोपडे यांनी भाजप पक्ष सोडून शरद पवार गटात जात असल्याचे सांगितलं.
दिलीप खोपडे यांनी भाजप पक्ष सोडण्याची कारणे सांगितली. यात निर्णय प्रक्रियेत विचारात घेतलं जात नाही, भाजप पक्ष हा ज्या ध्येय धोरणांवर चालत होता तो तसा आता चालत नाही, गिरीश महाजन यांच्याकडे कार्यकर्त्यांची कामे घेऊन जातो मात्र कामे होत नसल्याने कार्यकर्ते नाराज होतात, माझा कुठल्याही नेत्याविरुद्ध राग नाही, असं सांगत त्यांनी अप्रत्यक्षरीत्या मंत्री गिरीश महाजन यांच्यावर नाराजी व्यक्त केली. तसेच आपण 21 सप्टेंबरला शरद पवार यांच्या उपस्थितीत शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचं खोपडे यांनी जाहीर केलं. शरद पवार गटातून जामनेर मतदारसंघातून उमेदवारी मिळणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं. तसेच मंत्री गिरीश महाजन यांच्या विरुद्ध निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
मनोज जरांगे पाटील यांनी गिरीश महाजन यांना दिलेल्या धमकी वजा इशाऱ्याचा येणाऱ्या निवडणुकीत काय परिणाम होईल? याबाबत राजकीय विश्लेषकांची सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेतली. यात जरांगे पाटील यांनी केलेल्या आवाहनाला मराठा समाजाने पाठींबा दर्शविला तर यंदाची विधानसभा निवडणूक ही निश्चित गिरीश महाजन यांना अवघड जावू शकते, असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. गिरीश महाजन यांच्या विरोधात असलेले त्यांचे विरोधक यंदाच्या निवडणुकीत जरांगे पाटील यांच्या फॅक्टरचा उपयोग हत्यार म्हणून निवडणुकीत करतील.
लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात ज्याप्रमाणे जरांगे पाटील यांचा फॅक्टर चालला, स्वत: जरांगे पाटील यांनी या जामनेरमध्ये तळ ठोकून लक्ष घातलं, तर गिरीश महाजन यांच्यासमोरच्या अडचणी वाढू शकतात, असं राजकीय विश्लेषक सांगतात. मात्र दुसरीकडे जरांगे पाटील फॅक्टर असला तरी गिरीश महाजन यांनी गेल्या ३० ते ३५ वर्षात केलेली विकास कामे, आरोग्याच्या माध्यमातून केलेली कामे, त्यांचा मतदारसंघातील प्रभाव पाहता, गिरीश महाजन यांचा पराभव होईल हे सांगण आज धाडसाचं असेल असेही राजकीय विश्लेषक म्हणतात.
मात्र हवा कोणत्याही बाजूने पलटू शकते, लाट कोणत्याही क्षणाला तयार होवू शकते आणि परिवर्तीत देखील होवू शकते, त्यामुळे जरांगे पाटील यांचा इशारा हा गिरीश महाजन यांना सावधगिरीचा इशारा मानावा लागेल. आणि गिरीश महाजन यांना गांभीर्याने घ्यावा लागेल असं सुद्धा राजकीय विश्लेषक सांगतात.
जामनेरमधून यंदाच्या विधानसभेत मंत्री गिरीश महाजन यांना कुठलाही विरोध शिल्लक नसल्याचे चित्र असतानाच दिलीप दिलीप खोपडे यांच्या राजीनाम्यामुळे तसेच ते शरद पवार गटात जाणार असल्यने जामनेरमध्ये भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे. काही दिवसांपूर्वीच गिरीश महाजन जामनेरमधून कसे निवडून येतात, सव्वा लाख मतं मराठ्यांची आहेत, असं सांगत मनोज जरांगे पाटील यांनी गिरीश महाजन यांना यापूर्वीच थेट आव्हान दिलं आहे.
दिलीप खोपडे यांना शरद पवार गटातून उमेदवारी मिळणार असल्याचं सध्या स्थितीत सांगितलं जात आहे. खोपडे मराठा चेहरा आहेत. आपल्याला मराठा नव्हे तर सर्व समाज आपल्या पाठीशी असल्याचे खोपडे यांनी बोलून दाखवलं. दुसरीकडे जरांगे पाटील यांचा खोपडे यांना पाठिंबा मिळणार आणि शरद पवार यांची पॉवर यामुळे सलग सहा ते सात टर्म आमदार असलेल्या गिरीश महाजन यांना खोपडे पराभूत करून विजय होतील, अशी चर्चा आतापासून रंगली आहे. दिलीप खोपडे यांच्यामुळे मंत्री गिरीश महाजन यांना विधानसभेची निवडणूक आता पाहिजे तेवढी सोपी राहिलेली नाही, अशी सुद्धा चर्चा जिल्ह्यात रंगली आहे.