मुंबई: शिवसेनेचे बंडखोर नेते रामदास कदम (ramdas kadam) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) आणि आदित्य ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. तुमच्या आदित्य ठाकरेंचं शिवसेनेत (shivsena) योगदान काय? आदित्य ठाकरे हे तर आमदार आणि खासदारांनाही पाहत नाही. माझं खातं त्यांनी चालवलं. प्लास्टिक बंदी मी केली आणि हा माणूस म्हणतो प्लास्टिक बंदी मी केली. तेही सभागृहात सांगतो. किती खोटं बोलाल? दुसऱ्यांच्या कामाचं किती क्रेडिट घ्याल. हे हस्यास्पद आहे. असं चालत नाही, असं रामदास कदम म्हणाले. उद्धव ठाकरे हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे राहिले नाहीत. ते शरद पवार यांच्या विचारांचे झाले आहेत. पवारांच्या मांडिवर बसून ते पक्ष चालवत आहेत. उद्धव ठाकरे यांनीच बाळसाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला हे दुर्देवी आहे, असा घणाघाती हल्लाही रामदास कदम यांनी चढवला. ते टीव्ही9 मराठीवर बोलत होते.
आदित्य ठाकरेंना स्वत:चं खातं राहिलं बाजूला इतरांची खाती सांभाळायची आहेत. त्यांना आमदारांना भेटायचं नाही, खासदारांना भेटायचं नाही. आता तुमच्या जनसंवाद यात्रा सुरू आहेत. तुम्ही आता शिवसेना भवनाचे दरवाजे उघडे ठेवले आहेत. मातोश्रीचे दरवाजे उघडे ठेवले आहेत. सर्वांना भेटत आहात. हे जर तीन वर्ष केलं असतं तर शिवसेनेवर ही वेळ आली नसती, असा हल्लाबोल रामदास कदम यांनी केला.
कालची मुलाखत म्हणजे उंदराला मांजर साक्षी होती. संजय राऊत प्रश्न विचारणार आणि उद्धव ठाकरे उत्तर देणार. हे सर्व हस्यास्पद आहे. नवीन काय? गंजलेली तलवार, आईचं दूध … अरे आईचं दूध… शिवसेना आई होती. बाळासाहेबांची शिवसेना आई होती. बाळासाहेबांच्या विचाराशी गद्दारी केली कोणी ते तुम्ही सांगा ना? आईच्या दुधाची आठवण ठेवताय तर बाळासाहेबांच्या विचाराशी गद्दारी तुम्ही केली ना? असा सवालही त्यांनी केला.
यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर आपलं राजकारण संपण्याचा डाव रचल्याचा आरोप केला. उद्धव ठाकरे रुग्णालयात असताना बैठका झाल्या. या बैठकीला सुभाष देसाई, अनिल देसाई, अनिल परब, मिलिंद नार्वेकर, विनायक राऊत, आदित्य ठाकरे उपस्थित होते. त्यात रामदास कदम आणि आमदार योगेश कदम यांचं राजकारण संपवण्याचं ठरलं. राष्ट्रवादीला पुढे आणण्यासाठी आम्हाला संपवलं जात होतं. कोकणातून रामदास कदमांना हटवून शिवसेनाच हद्दपार झाली असती. पण मी रामदास कदम आहे. मला कोणीच संपवू शकत नाही, असा इशाराही त्यांनी दिला.