नुकताच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. महाराष्ट्रात महायुतीने प्रचंड बहुमत मिळवलं आहे. महायुतीचे 230 पेक्षा जास्त आमदार निवडून आले आहेत. एकट्या भाजपाने 130 पेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत. त्याखालोखाल एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने 57 आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 41 जागा जिंकल्या आहेत. महायुतीने इतक प्रचंड मोठ यश मिळवल्यानंतर सत्ता स्थापनेच्या घडामोडी वेगाने घडतील अशी अपेक्षा होती. पण मुख्यमंत्रीपदावरुन पेच फसल्याच दिसत आहे. महाराष्ट्रात निवडणूक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात आली. मुख्यमंत्री कोण होणार? याचा निर्णय निवडणूक निकालानंतर घेणार अस महायुतीने आधीच जाहीर केलं होतं.
भाजपाने ही निवडणूक देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लढवली होती. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री व्हावं, अशी भाजप नेते, पदाधिकारी, नवनिर्वाचित आमदार, कार्यकर्त्यांची इच्छा आहे. पण दुसऱ्याबाजूला एकनाथ शिंदे सुद्धा मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही असल्याची चर्चा आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे नेते, पदाधिकारी एकनाथ शिंदे यांनीच मुख्यमंत्रीपदी कायम रहावं, असं सातत्याने मीडियामधून विधान करत आहेत. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळावं यासाठी काही ठिकाणी आरत्या सुद्धा करण्यात आल्या. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात निवडणूका लढल्यानंतर मिळालेल्या यशामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांना मुख्यमंत्री पदाची अपेक्षा आहे.
आज अमित शाह महाराष्ट्रात येणार का?
मुख्यमंत्री पदावरुन निर्माण झालेली ही स्थिती लक्षात घेता, समोपचारानं दोन्ही पक्षांच्या नेत्यांना समजावून सांगून मार्ग काढण्याचा भाजप श्रेष्टींचा प्रयत्न आहे. वाटाघाटी करून महाराष्ट्रातील राजकीय पेचातून मार्ग काढला जाईल, अशी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची माहिती दिली. वाटाघाटी पूर्ण केल्यानंतरच भाजपचा गटनेता निवडला जाणार आहे. त्यानंतरच निरिक्षक महाराष्ट्रात पाठवला जाणार. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची माहिती आहे. आज केंद्रीय मंत्री अमित शहा यांचा राजधानी दिल्ली इथं पाच वाजता शासकीय कार्यक्रम असल्यानं अमित शहा महाराष्ट्रात येण्याची शक्यता कमी आहे.