नवी दिल्ली : राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून लोकसभा निवडणुकीबाबत अजूनही ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेण्यात आली आहे. मनसेला आघाडीत घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची तयारी आहे, मात्र काँग्रेसने मनसेला सोबत घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे. मात्र तरीही आज दिल्लीत काँग्रेसची बैठक होणार असून, त्यात मनसेला आघाडीत घेण्यासंदर्भात चर्चा होणार आहे.
राज्यातील काँग्रेस नेत्यांची आज केंद्रीय नेत्यांसोबत दिल्लीत बैठक होणार आहे. तसेच, शरद पवार आणि राहुल गांधी यांचीही भेट होणार आहे. काँग्रेसच्या बैठकीत आणि राहुल गांधी-शरद पवार यांच्या भेटीत मनसेबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
भाजप-शिवसेनेच्या विरोधात असणाऱ्या सर्व छोट्या पक्षांना सोबत घेण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत, असं राष्ट्रवादीने आधीच जाहीर केलं आहे. त्यामुळे आता मनसे महाआघाडीत जाते की स्वबळावर निवडणूक लढते, हे दोन ते तीन दिवसात समोर येईल.
मनसेला सोबत घेण्यास काँग्रेसचा विरोध का?
उत्तर भारतीयांचा कट्टर विरोधक पक्ष म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ओळख आहे. त्यामुळे मनसेला सोबत घेतल्यास काँग्रेसला देशातील हिंदी पट्ट्यात मोठा फटका बसू शकतो. विशेषत: उत्तर प्रदेश, बिहार यांसारख्या राज्यांमधील जनतेच्या रोषाला काँग्रेसला सामोरं जावं लागू शकतं. त्यामुळे काँग्रेसने मनसेला सोबत घेण्याच्या राष्ट्रवादीच्या प्रस्तावाला विरोध केला आहे.
निवडणुकीच्या तारखा जाहीर
केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी 10 मार्चला लोकसभा निवडणूक 2019 च्या तारखा जाहीर केल्या. लोकसभेच्या 543 जागांसाठी 7 टप्प्यात मतदान होणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. 11, 18, 23, 29 एप्रिल, तर 6, 12 आणि 19 मे रोजी अशा सात टप्प्यात मतदान होईल. देशभरातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी याबाबतची घोषणा केली.
महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात 11 एप्रिल 2019 रोजी पहिलं मतदान होईल. महाराष्ट्रातील 48 जागांसाठी चार टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला 7 जागांसाठी, दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला 10 जागांसाठी, तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला 14 जागांसाठी आणि चौथा टप्प्यात 29 एप्रिलला 17 जागांसाठी मतदान होणार आहे.
संबंधित बातम्या :
लोकसभा निवडणूक 2019 : प्रचार, मतदान ते निकाल, A टू Z माहिती