नवी दिल्ली : नरेंद्र मोदी आज (30 मे) संध्याकाळी 7 वाजता पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. यावेळी मोदींच्या मंत्रिमंडळातील 50 सहकारीही मंत्रिपदाची शपथ घेतील. विशेष म्हणजे, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचीही वर्णी केंद्रीय मंत्रिपदी लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे अमित शाह यांना कोणतं मंत्रिपद दिलं जाणार, याचीच चर्चा सध्या देशभर रंगताना दिसत आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना कोणतं मंत्रिपद मिळेल, या चर्चेला सध्या उधाण आलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अमित शाह यांना केंद्रीय गृहमंत्रिपद मिळू शकतं. विशेष म्हणजे, मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात केंद्रीय गृहमंत्रिपद पाचही वर्षे भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि वरिष्ठ नेते राजनाथ सिंह यांनी सांभाळले होते.
जर केंद्रीय गृहमंत्रिपद अमित शाह यांना दिलं गेलं, तर भाजपचे वरिष्ठ नेते राजनाथ सिंह यांच्याकडे कोणतं मंत्रिपद दिले जाणार, याचीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
अमित शाह यांनी गुजारतमधील भाजप सरकारमध्ये गृहमंत्रिपद सांभाळलं होतं. नरेंद्र मोदी यांच्या अत्यंत मर्जीतील आणि निकटवर्तीय मानले जाणारे अमित शाह हे आता मोदींना केंद्रात मंत्री म्हणूनही साथ देताना दिसतील.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अमित शाह यांची कारकीर्द यशस्वीपणे सुरु असताना, त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी करुन घेण्याचा निर्णय भाजपकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे आता अमित शाह यांनी केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतल्यास, भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कुणाला स्थान मिळतं, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.