नवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी आणि यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या कन्या प्रियांका गांधी यांच्या खांद्यावर जानेवारी महिन्यात काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोठी जबाबदारी दिली. उत्तर प्रदेशच्या पूर्व विभागाची जबाबदारी प्रियांका यांच्याकडे देण्यात आली आहे, तर पश्चिम विभागाची जबाबदारी ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे देण्यात आली. प्रियांका यांनी जबाबदारी स्वीकारुन धडाडीने कामाला सुरुवातही केली. या निवडीनंतर महिन्याभराने राहुल गांधी यांनी प्रियांका आणि ज्योतिरादित्य शिंदे यांना प्रत्येकी तीन-तीन आणखी शिलेदार दिले आहेत. यातील प्रियांका यांना सहकार्य करणाऱ्या तीन जणांच्या टीममध्ये महाराष्ट्रातील एकजण आहेत. कोल्हापुरातील बाजीराव खाडे यांचा ‘टीम प्रियांका’मध्ये समावेश आहे.
नवीन शिलेदार कोण?
प्रियांका गांधींच्या टीममध्ये कोल्हापूरच्या बाजीराव खाडे यांचा समावेश करण्यात आला आहे. काँग्रेसच्या उत्तर प्रदेश पूर्व विभागाचे प्रभारी सचिव म्हणून खाडे यांची निवड करण्यात आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून तरुण कार्यकर्त्यांना संधी देण्यात येत आहे. प्रियांका टीममध्ये जुबेर खान आणि कुमार आशिष यांचाही समावेश असणार आहे. त्यांच्या सचिव पदाच्या निवडीचे पत्र काँग्रेसचे सरचिटणीस खासदार के. सी. वेणुगोपाल यांनी मंगळवारी दिले.
बाजीराव खाडे कोण आहेत?
बाजीराव खाडे हे मूळचे कोल्हापुरातील असून, निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. काँग्रेसच्या पंचायतराज समितीवर राष्ट्रीय सरचिटणीसपदी खाडे यांनी काम केलं आहे. तेलंगणाचेही प्रभारी म्हणून देखील बाजीराव खाडे यांनी काम केलं आहे.
एमएससी ऍग्री, एमबीए शिक्षण घेतलेले बाजीराव खाडे यांना शासनाने कृषीनिष्ठ शेतकरी पुरस्कारानेही गौरवलं आहे. शेतकरी, दूध उत्पादक यांच्या न्यायासाठी लढणारा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे.
याआधी महाराष्ट्रातील खासदार राजीव सातव यांना गुजरातचे प्रभारीपद देऊन तरुण नेतृत्त्वाला मोठी संधी दिली आहे. त्यानंतर आता बाजीराव खाडे यांना थेट ‘टीम प्रियांका’मध्ये स्थान देण्यात आले आहे. एकूणच जर पाहिलं तर काँग्रेसकडून कात टाकायला सुरुवात झाली आहे. प्रत्येक पातळीवर तरुणांकडे नेतृत्व सोपवून भाजपला टक्कर देण्याचा प्रयत्न केला जातो आहे. त्याचा एक भाग म्हणून आता नव्या टीमची निवड करण्यात आली आहे.