निवृत्ती बाबर, टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी, 29 नोव्हेंबर 2023, मुंबई : माजी महापौर दत्ता दळवी यांना अटक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवीगाळ केल्यामुळे दळवी यांनी त्यांच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली आहे. दळवी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांना कोर्टातही उपस्थित केलं जाणार आहे. दळवी यांच्या अटकेमुळे ठाकरे गटात एकच खळबळ उडाली असून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना भांडूप पोलीस स्टेशन बाहेर प्रचंड गर्दी केली आहे. दत्ता दळवी यांना अटक केल्याने दळवी कोण आहेत? असा प्रश्न विचारला जात आहे. त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर जहरी टीका करण्यामागचे कारण काय? असा सवालही केला जात आहे.
साधा शिवसैनिक ते महापौर असा दत्ता दळवी यांचा प्रवास राहिला आहे. दत्ता दळवी 2005 ते 2007 या कालावधीत मुंबईचे महापौर होते. महापौर म्हणून दत्ता दळवी यांची कारकिर्द चांगलीच गाजली होती. शिवसेनेचे धाडसी आणि आक्रमक नेते म्हणून दळवी प्रसिद्ध आहे. ईशान्य मुंबईत दळवी यांचं प्राबल्य आहे. शिवसेनेत विभाग क्रमांक 7 चे विभागप्रमुख म्हणून त्यांनी पद भूषविले आहे. ते शिवसेनेचे उपेनेतेही होते. 2018मध्ये शिवसेनेच्या ईशान्य मुंबईतील महिला पदाधिकाऱ्यांनी गटबाजी केल्यामुळे दळवी यांना ईशान्य मुंबईच्या तत्कालीन विभाग क्रमांक 7 च्या विभागप्रमुखपदाचा राजीनामा उद्धव ठाकरेंकडे सुपूर्द केला होता. त्यावेळी दळवी यांनी राजीनामा स्वतः दिला की उद्धव ठाकरे यांनी त्यांना द्यायला लावला अशी चर्चा सुरु होती. या प्रकरणामुळे दळवी चर्चेत आले होते.
एप्रिल 2022मध्ये मालवण तालुक्यातील तळगाव गावडेवाडी तलावाजवळ बैल झुंजीचे अनधिकृतपणे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये एका बैलाचा मृत्यू झाला. या प्रकरणात एका बैलाच्या मृत्यूस आणि अन्य बैलांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मालवण, कुडाळ, वेंगुर्ले येथील 12 मुख्य संशयितांसह अन्य अज्ञात व्यक्तींविरोधात येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये दत्ता दळवी यांचाही समावेश होता.
दरम्यान, दत्ता दळवी यांना मुलुंड कोर्टात हजर केलं जाणरा आहे. भांडूप पोलीस त्यांना मुलुंड कोर्टात आणणार आहेत. त्यामुळे कोर्टाकडून दळवी यांना काय शिक्षा दिली जाते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या आधी भांडूप पोलिसांनी दळवी यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. भांडूप पोलिसांनी दत्ता दळवी यांच्या विरोधात भादंवि कलम 153 (अ),153 (ब),153(अ)(1)सी, 294, 504,505(1)(क) अन्वये गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे.