महाराष्ट्रासह देश पातळीवरील राजकीय क्षेत्रातील अत्यंत मानाचं नाव म्हणजे शरद पवार. गेली पन्नासहून अधिक वर्षे संसदीय राजकारणात सक्रीय असलेल्या शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदापासून देशाच्या कृषिमंत्रिपदापर्यंत अनेक महत्त्वाची पदं भूषवली आहेत. राजकारणासह कला, क्रीडा अशा नाना क्षेत्रात महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. त्यामुळे शरद पवारांच्या कुटुंबातील नव्या पिढीबाबत उत्सुकता आणि कुतूहल अवघ्या महाराष्ट्राला आहे, यात नवल नाही. शरद पवारांच्या पुढच्या पिढीतले अजित पवार आणि सुप्रिया सुळे राजकारणात आले. मात्र, आता शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळेंचा राजकीय वारसा पुढे कोण नेणार? तर दोन नावं प्रामुख्याने समोर येतात, एक म्हणजे अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार आणि दुसरे म्हणजे अजित पवारांचे थोरले चुलत बंधू राजेंद्र पवारांचे सुपुत्र रोहित पवार. यातील पार्थ पवार तर अद्याप राजकारणात सक्रीय झाले नाहीत. मात्र रोहित पवार हे नुसते सक्रीय झाले नाहीत, तर आपलं नेतृत्त्वही त्यांनी सिद्ध केले आहे.
रोहित पवार हे शरद पवारांचे नातू इथवर एव्हाना महाराष्ट्रातील जनतेला कळलं आहे. मात्र, नात्या-गोत्याच्या पलिकडे रोहित पवार यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. तरुणांना शेतीची आवड नाही, शेतीतलं कळत नाही, ही गृहितकं मोडीत काढून, रोहित पवार यांनी केवळ शेतीबद्दल जाण बाळगली नाही, तर शेती क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे.
शरद पवार आणि अजित पवारांशी नातं काय?
रोहित पवार हे राजेंद्र पवार यांचे सुपुत्र आहेत. राजेंद्र पवार म्हणजे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे चुलत बंधू. राजेंद्र पवार यांचे वडील पद्मश्री आप्पासाहेब पवार हे देशाचे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे बंधू. राजकारणात रोहित पवार यांची ओळख शरद पवारांच्या नावाने होणे सहाजिक आहे. मात्र, पवारांच्या नावासोबत येणारी भलीमोठी जाबाबदारीही पेलण्याची ताकद रोहित पवारांमध्ये दिसून येते. शरद पवारांकडे जे शेतीविषयक अफाट ज्ञान आहे, त्याची चुणूक रोहित पवारांमध्ये दिसून येते.
रोहित पवारांचं शिक्षण आणि वडिलांना हातभार
घरची परिस्थिती पाहता रोहित पवार यांना परदेशात शिक्षण घेणं सहज शक्य होतं. मात्र, त्यांचं पूर्ण शिक्षण बारामती, पुणे आणि मुंबई येथेच झाले. बारामतीच्या ग्रामीण भागात प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर, पुढे 12 वीपर्यंतचं शिक्षण पुण्यात घेतलं. व्यवस्थापन शास्त्रातील उच्च शिक्षण मुंबई विद्यापीठातून पूर्ण केलं. त्यानंतर परदेशात शिक्षणाची संधी निर्माण झाली असताना, परदेशात न जाता वडिलांना व्यवसायात मदत करण्याच निर्णय रोहित पवार यांनी घेतला आणि वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी बारामती अॅग्रो लिमिटेडमध्ये पदभार स्वीकारुन व्यवसायात सक्रीय झाले.
रोहित पवार सध्या भूषवत असलेली पदं :
1. मुख्य कार्यकारी अधिकारी, बारामती अॅग्रो लिमिटेड
2. अध्यक्ष, इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (आतापर्यंतचे सर्वात तरुण अध्यक्ष म्हणून नोंद)
3. उपाध्यक्ष, वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन
4. संचालक, आयएसईसी
5. नियमक मंडळ सदस्य, वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट
6. कार्यकारी सल्लागार समिती सदस्य, इंडियन पोल्ट्री इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन ऑफ इंडिया
राजकारणात सक्रीय
वडिलांसोबत व्यवसायात उतरलेल्या रोहित पवारांनी पुढे आजोबा शरद पवार आणि काका अजित पवार यांच्या पावलावर पाऊल टाकत, राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला. पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिरसुफळ गणातून रोहित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढलवी आणि राज्यात दुसऱ्या, तर पुणे जिल्ह्यात पहिल्या क्रमांकाच्या विक्रमी मताधिक्क्यांनी ते निवडून आले. एकंदरीत राजकारणातील प्रवेशही मोठ्या दिमाखात झाला. सध्या जिल्हा परिषद सदस्य म्हणून विविध कामांचा धडाका त्यांनी सुरु केला आहे. या कामांची सोशल मीडियासह अनेक ठिकाणी चर्चा सुरु असते.
‘सृजन’ उपक्रम
जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर रोहित पवारांनी प्रामुख्याने आरोग्य, शिक्षण, क्रीडा, तरुणांसाठी व्यवसाय प्रशिक्षण यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवण्यास सुरुवात केली. ‘सृजन’ हा उपक्रम त्यातीलच एक. ‘सृजन’च्या माध्यमातून ग्रामीण भागातील तरुण-तरुणींना व्यासपीठ मिळवून दिलं. याच माध्यमातून विविध कार्यक्रमांचं आयोजनही ते करत असतात.
तरुण-तरुणींनी व्यवसायाकडे वळावं!
तरुण-तरुणींना व्यवसायाकडे वळावं, यासाठी रोहित पवार कायम प्रोत्साहनपर कार्यक्रम आयोजित करतात. नोकरीचा प्रश्न गंभीर असल्याने, व्यवसायाच्या दृष्टीने मार्गदर्शन आणि मदत करणाऱ्या उपक्रमांची गरज आहे, अशी भावना रोहित पवार यांची त्यामागे आहे. विविध व्यवयासियक मार्गदर्शन, कौशल्य विकास इत्यादी गोष्टी या अंतर्गत ते करतात.