मुंबई: शिवसेनेच्या आमदार यामिनी जाधव (yamini jadhav) या सुद्धा एकनाथ शिंदे (eknath shinde) गटात सामिल झाल्या आहेत. शिंदे यांनी बंड केल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या सुरतला गेल्या. ठाकरे कुटुंबाशी अत्यंत घनिष्ठ संबंध असलेल्या यामिनी जाधव यांनीही बंड केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. शिवसेनेच्या (shivsena) रणरागिणी, कट्टर शिवसैनिक, आक्रमक आणि अभ्यासू नगरसेविका आणि आता आमदार, असा यामिनी जाधव यांचा प्रवास राहिला आहे. त्या भायखळ्यातून आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांनीही शिवसेनेविरोधात बंड पुकारल्याने शिवसैनिकही आश्चर्यचकीत झाले आहेत. तर आपल्या पडत्या काळात कोणत्याही वरिष्ठ नेत्याने आपली साधी विचारपूस केली नाही. कॅन्सर झाल्यानंतरही कळवूनही कुणी विचारपूस केली नाही. त्यामुळे मला प्रचंड वेदना झाल्या होत्या, असं सांगत यामिनी जाधव यांनी आपल्या बंडाचं समर्थन केलं आहे.
यामिनी जाधव आणि त्यांचे पती यशवंत जाधव हे दोघेही शिवसेनेत सक्रिय आहेत. शिवसैनिक ते आमदार असा यामिनी जाधव य़ांचा प्रवास राहिला आहे. यामिनी जाधव या उच्च शिक्षित आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून त्या शिवसेनेत सक्रिय आहेत. 2012 मध्ये त्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. त्यानंतर 2019मध्ये त्यांना शिवसेनेने भायखळ्यातून तिकीट दिलं. यावेळी त्या एमआयएमच्या वारिस पठाण यांना पराभूत करून विजयी झाल्या. विशेष म्हणजे पठाण हे स्थानिक आमदार होते. तर यामिनी जाधव या पहिल्यांदाच विधानसभेला उभ्या होत्या. तसेच हा संपूर्ण परिसर मुस्लिम बहुल असतानाही त्या विजयी झाल्या होत्या. त्यांनी महापालिकेत नगरसेविका म्हणून विविध समित्यांवर चांगलं काम केलं होतं.
यामिनी जाधव यांचं नाव मधल्याकाळात महापौरपदासाठी चर्चेत आलं होतं. महापौरपद अनुसुचित जातीसाठी राखीव झालं होतं. त्यामुळे या पदासाठी स्नेहल आंबेकर, भारती बावधान आणि यामिनी जाधव यांच्या नावाची चर्चा सुरू झाली होती. मात्र, शिवसेनेने महापौरपदाची सूत्रे स्नेहल आंबेकरांकडे सोपवली होती.
यामिनी जाधव यांचे पती यशवंत जाधव हे महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यानंतर आयटीने यशवंत जाधव यांना नोटीस बजावली होती. त्यानंतर त्यांच्या घरावर आयटीने रेड मारली होती. यशवंत जाधव यांच्यावर 15 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला होता.