मुंबई– राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)आणि शिवसेना (Shivsena)यांच्यातील वाद आता टोकाला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेले मंत्री सध्याकाळपर्यंत मंत्रिपदाचा राजीनामा (resignation)देण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत काही आमदार हे सूरतमध्ये ले मेरिडियनमध्ये असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्यासोबत नेमके किती आमदार आहेत, याची संख्या अद्याप गुलदस्त्यात आहे. काही आमदार सूरतच्या दिेशेने निघाले असल्याची चर्चा आहे. राज्यातले शिवसेनेचे अनेक आमदार नॉट रिचेबल असल्याची माहिती आहे. दरम्यान सूरतमध्ये ले मेरिडियन हॉटेलात एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सचिव मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक गेले असले तरी आता हा संघर्ष आता चिघळणार हे निश्चित झाले आहे. अशा स्थितीत कुणाकडे किती आमदार आहेत, याबाबत आता दावे–प्रतिदावे करण्यात येत आहेत.
दरम्यान दुपारी झालेल्या शिवसेना आमदारांच्या बैठकीत, एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर, उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळ गटनेतेपदावरुन त्यांची उचलबांगडी केली आहे. त्यांच्याऐवजी शिवसेना आमदार अजय चौधरी यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. याचाच अर्थ शिंदे यांच्याशी चर्चा करण्याचे मार्ग प्रत्यक्ष चर्चेपूर्वीच उद्धव ठाकरे यांनी थांबवल्याचा हा संदेश मानला जातो आहे.
या आमदारांच्या बैठकीला ३३ शिवेसनेचे आमदार उपस्थित होते, असा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. त्यामुळेच बहुमताने विधिमंडळ गटनेतेपदावरुन उचलबांगडीचा निर्णय घेण्यात आल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. काही आमदार हे दिल्लीत असल्याचाही दावा राऊत यांनी केला आहे. गुजरातमध्ये असलेल्या आमदारांच्या जीवाला धोका असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. काही आमदारांनी फोन करुन हत्या होऊ शकते, अशी भीती व्यक्त केल्याचेही राऊत यांचे म्हणणे आहे. तसेच ९ आमदारांच्या कुटुंबीयांनी संपर्क होत नसल्याची तक्रार केल्याचेही राऊत यांनी सांगितले आहे.
दरम्यान एकनाथ शिंदे यांच्यासोबत ३५हून अधिक आमदार असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात येतो आहे. त्यामुळे विधिमंडळ गटनेतेपदावरुन शिंदे यांची हकालपट्टी करता येणार नसल्याचा दावा करण्यात आला आहे. ज्या बैठकीत हा निर्णय झाला, त्या ठिकाणी शिवसेनेचे बहुसंख्य आमदार उपस्थितच नसल्याचा दावा करण्यात येते आहे. त्यामुळे विधिमंडळ गटनेते पदावरुन शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे असा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. आता शिवसेना आमदारांचे संख्याबळ कुणाकडे किती आहे, हे स्पष्ट होत नाही, तोपर्यंत हा वाद चिघळत राहणार असल्याची शक्यता आहे.