निवृत्ती बाबर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 5 डिसेंबर 2023 : मुंबई आणि कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होत आहे. त्यासाठी ठाकरे गटाने जोरदार तयारी सुरू केली आहे. ठाकरे गट या निवडणुकीसाठी कुणाला उमेदवारी देणार याची जोरदार चर्चा रंगलेली आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी ठाकरे गटाकडून वरुण सरदेसाई आणि अनिल परब यांच्या नावाचा विचार केला जातोय. दोघांचीही नावे चर्चेत असली तरी मातोश्रीतून काय निर्णय होतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मुंबई आणि कोकण पदवीधर तसेच मुंबई आणि नाशिक शिक्षक विधानपरिषद मतदारसंघात २०२४ मध्ये निवडणुका होणार आहेत. त्यासाठी जोमाने नोंदणी सुरू आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघातून तरुण नेत्याला शिवसेना ठाकरे गट उतरवण्याच्या तयारीत असल्याची सूत्रांची माहिती आहे. यामध्ये शिवसेना सचिव वरूण सरदेसाई यांच्या नावाचा विचार सुरू आहे. तर याच मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी शिवसेना ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार अनिल परब यांना सुद्धा उमेदवारी देण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. त्यामुळे पदवीधरची माळ कुणाच्या गळ्यात पडते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
अनिल परब यांची विधान परिषदेची टर्म जुलै 2024 मध्ये पूर्ण होत आहे. त्यामुळे अनिल परब हे मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी ठाकरे गटाचे उमेदवार असू शकतात. मुंबई पदवीधर विधान परिषदेच्या जागेसाठीची यादी ठाकरे गटाकडून विलास पोतनीस यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर कोकण पदवीधर मतदारसंघातून किशोर जैन यांच्या नावावर विचार सुरू असल्याचं सांगितलं जात आहे.
या पदवीधर मतदारसंघांसाठी 2018 ला निवडणूक पार पडल्या होत्या. त्यामुळे आता याची टर्म संपत आल्याने लवकरच निवडणूका होणार आहेत. कोकण मतदारसंघातून निरंजन डावखरे यांच्या विरोधात कोकणातील ठाकरे गटाचे सह संपर्कप्रमुख आणि अनंत गीते यांचे विश्वासू शिवसैनिक किशोर जैन यांच्या नावाची वर्णी लागण्याची सूत्रांची माहिती आहे. आदित्य ठाकरे यांच्या नुकत्याच पार पडलेल्या कोकण खळा बैठका पार पडल्या होत्या.
कोकण आणि मुंबईच्या अहवालाची जबाबदारी ही किशोर जैन यांच्यावर होती. त्यामुळे जैन त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याचं सांगितलं जात आहे. या निवडणुकीसाठी मतदारांची प्रारूप यादी 23 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानंतर 23 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर या कालावधीत या याद्यांवर हरकती मागविण्यात येत आहेत.