नागपूर : निवडणुकीसाठी अर्ज भरा, गावोगावी फिरुन प्रचार करा, या सर्व प्रक्रियेसाठी लाखो रुपये खर्च करा. एवढं सारं करुन तीन महिन्यांसाठी आमदार होण्यासाठी फारसं कुणी उत्सुक नसतं. अगदी तिच परिस्थिती काटोल विधानसभेतील पोटनिवडणुकीत आहे. 11 एप्रिलला काटोल विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. मे महिन्याच्या शेवटी निकाल लागेल. आणि राज्यातालील विधानसभा निवडणूक सप्टेंबरमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. म्हणजे काटोलच्या नव्या आमदाराला फक्त तीन महिने कार्यकाळ मिळणार आहे. त्यामुळेच या निवडणुकीसाठी राजकीय पक्षाचे नेते फारसे उत्सुक दिसत नाही.
भाजपचे आमदार आशिष देशमुख यांनी राजीनामा दिल्यामुळे काटोलमध्ये पोटनिवडणूक होत आहे. आघाडीत राष्ट्रवादीकडे असलेली काटोलची जागा ही माजी मंत्री अनिल देशमुख यांचा मतदारसंघ आहे. तर युतीत ही जागा शिवसेनेकडे आहे. इथे राष्ट्रवादीचं पारडं जड असलं तरीही अनिल देशमुखही तीन महिन्यासाठी आमदारकी लढवण्यास फारसे इच्छुक दिसत नाहीत. त्यामुळे सर्व पक्षांनी मिळून यावर विचार करावा आणि पर्याय काढण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.
काटोल विधानसभा
नागपुरातील काटोल विधानसभा मतदारसंघावर महाराष्ट्राच्या स्थापनेपासून कायम काँग्रेसचं वर्चस्व राहिलं आहे. मात्र1995 साली अनिल देशमुख अपक्ष म्हणून आणि पुढे तेच अनिल देशमुख राष्ट्रवादीकडून जिंकत गेले. त्यामुळे पुढे काटोल राष्ट्रवादीचा बालेकिल्ला ठरला. मात्र 2014 साली डॉ. आशिष देशमुखांनी राष्ट्रवादीच्या ताब्यातून काटोल खेचून आणलं आणि जिंकले. मात्र, विदर्भाचा मुद्दा, शेतकऱ्यांचा मुद्दा इत्यादी मुद्द्यांवरुन डॉ. आशिष देशमुख यांनी राजीनामा दिला.
डॉ. आशिष देशमुखांचा राजीनामा
डॉ. आशिष देशमुख हे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री रणजित देशमुख यांचे सुपुत्र आहेत. अत्यंत उच्चशिक्षित असलेले डॉ. आशिष देशमुख यांनी भाजपकडून विधानसभा लढवली आणि जिंकलेही. मात्र, विदर्भातील विकासाच्या मुद्द्यावर त्यांनी सत्ताधारी स्वपक्षावरच नाराजी व्यक्त केली आणि आमदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे काटोल विधानसभा मतदारसंघात आता पोटनिवडणूक घेण्यात येत आहे.