मुंबई: भाजपची ओबीसी कार्यकारिणीची आज बैठक पार पडली. या बैठकीत भाजपने पुन्हा एकदा ओबीसींना जवळ करण्याचा नारा दिला आहे. त्यामुळे भाजपचं आगामी राजकारण ओबीसी केंद्रीत राहिल असं बोललं जात आहे. पण भाजपच्या ओबीसी केंद्रीत राजकारणाला फारसं यश येणार नाही, असं राजकीय विश्लेषक सांगत आहेत. वंचित बहुजन आघाडीकडे गेलेला ओबीसी वर्ग, राष्ट्रवादीने सुरू केलेलं सोशल इंजीनियरिंग या पार्श्वभूमीवर भाजपवर त्यांची मूळ ओबीसी व्होटबँक मजबूत करण्याची वेळ आल्याचं बोललं जात आहे. भाजपवर ही वेळ का आली? त्याचा घेतलेला हा आढावा. (why bjp plays obc card?, read political expert comment)
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
मुंबईत आज भाजपच्या ओबीसी कार्यकारिणीची बैठक पार पडली. त्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा ओबीसींना जवळ करण्याचा प्रयत्न केला. मराठा समाजाला आरक्षण देताना आम्ही त्यात ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार जाणार नाही, याबाबतचं कलम टाकलं. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे. पण या कलमाला कोणतीही स्थगिती दिली नाही. या कलमाद्वारे आम्ही ओबीसी आरक्षणाला संरक्षण दिलं आहे, असं सांगतानाच कोणत्याही परिस्थितीत आम्ही ओबीसी आरक्षणात वाटेकरी स्वीकारणार नाही. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावाल तर याद राखा, रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा फडणवीस यांनी दिला आहे. त्यामुळे भाजपने पुन्हा एकदा आपला मोर्चा ओबीसींकडे वळवण्याचा प्रयत्न केला असल्याचं बोललं जात आहे.
मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी येऊ शकते
ओबीसी हा भाजपचा मूळ आधार होता. माळी, धनगर. वंजारी यांना ‘माधव’ नावाने संघटीत करण्याचं काम भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी केलं. त्यांनी बहुजनांना भाजपमध्ये आणण्याचा प्रयत्न केला होता. मुंडे असेपर्यंत ओबीसींचा जनाधार भाजपकडे होते. मात्र, मुंडे यांच्या निधनानंतर देवेंद्र फडणवीस आले. त्यामुळे भाजपचा चेहरा पुन्हा ब्राह्मणी झाला. त्यानंतर मराठा आरक्षण आलं. हे आरक्षण सुरू असताना ते घटनेच्या चौकटीत बसत नाही आणि ते देणंही शक्य होणार नाही. त्यामुळे काही प्रमाणात मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी पुढे आली आहे. भविष्यातही मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी पुढे येऊ शकते. भाजपने ओबीसींकडे जाण्याला ही सुद्धा पार्श्वभूमी असू शकते, असं ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनी सांगितलं.
भाजपचं ओबीसींकडे जाण्यामागचं दुसरं कारण म्हणजे काहीही झालं तरी मराठा समाज हा भाजपकडे जाणार नाही. एखाद्या निवडणुकीत हा समाज चुकून भाजपकडे जाईल. पण हा समाज कायम काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्याच मागे राहतो. त्यामुळेच ओबीसींची व्होटबँक मजबूत करण्याचा भाजपचा हेतू असू शकतो. भाजपने गेल्यावेळी सर्व समाजाला जवळ करण्याचा प्रयत्न केला होता. आताही त्यांचा तोच प्रयत्न आहे. त्यांचं ओबीसी प्रेम हे पुतणा-मावशीचं प्रेम आहे. दलित समाज भाजपकडे जात नाही, मराठा समाज राष्ट्रवादीच्या पाठी असतो. फक्त ओबीसीच त्यांच्या सोबत असतात. त्यामुळे ही व्होटबँक अधिक मजबूत करण्यावर त्यांचा भर असेल, असंही चोरमारे यांनी सांगितलं.
भाजपकडे पर्याय नाही
राज्यात नवं समीकरण निर्माण झालं आहे. शिवाय वंचित बहुजन आघाडीलाही ओबीसींनी मोठी साथ दिली आहे. त्यामुळे भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. तसेच मराठा समाज भाजपपासून दूर जात आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने ओबीसींना जवळ करण्याशिवाय भाजपकडे पर्याय उरला नसल्याचं ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत ज. वि. पवार यांनी सांगितलं. माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्याने भाजपला गळती लागायला सुरुवात झाली आहे. शिवाय भाजपचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे असल्याचं सर्व समाजाला कळून चुकलं आहे. मंडल आयोगापासून ओबीसींनी स्वतंत्र आयडेंटीटी निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. वंचितकडेही ओबीसी येत आहेत. त्यामुळे ही व्होटबँक कायम ठेवण्याचा भाजपचा हा प्रयत्न आहे. पण आगामी काळात ओबीसी समाज भाजपकडे जाण्यापेक्षा स्वत:चा राजकीय पक्ष निर्माण करेल, अशी चिन्हं आहेत, असं निरीक्षण पवार यांनी नोंदवलं.
हा ओबीसी केंद्रीत राजकारणाचा डाव
भाजप हा भुलथापा देणारा पक्ष आहे. तो दिशाभूल करतो. हे मराठा समाजालाही कळून चुकलं आहे. मराठा समाज राज्यात सक्षम असला तरी राज्यात संख्येने ओबीसींपेक्षा कमी आहे. ओबीसींची राज्यात संख्या जास्त असली तरी ओबीसींकडे सर्वव्यापी असा नेता नाही. त्यामुळेच ओबीसींना जवळ करण्याचा भाजपने प्रयत्न सुरू केल्याचं राजकीय विश्लेषक प्रा. डॉ. जी. के. डोंगरगावकर यांनी सांगितलं. एकनाथ खडसे राष्ट्रवादीत गेले तरी त्याचा भाजपवर फारसा परिणाम होणार नाही. खडसे ओबीसी नेते असले तरी जळगावच्या पलिकडे त्यांचा प्रभाव नाही. ओबीसी हा भाजपचा मूळ प्रवाह आहे. त्यामुळे त्यांनी ओबीसी केंद्रीत राजकारण सुरू केलं असून भाजपच्या या खेळीला फारसा प्रतिसाद मिळेल, असं वाटत नाही, असं डोंगरगावकर यांनी स्पष्ट केलं. (why bjp plays obc card?, read political expert comment)
LIVE : महत्त्वाच्या घडामोडी https://t.co/iN092UqbSI
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 13, 2020
संबंधित बातम्या:
भुजबळ, वडेट्टीवार वातावरण खराब करत आहेत, सरकारला समाजात तेढ निर्माण करायची आहे का?; मेटेंचा सवाल
उद्धव ठाकरे म्हणतात 25 वर्षे सत्तेत राहू, मग आम्ही काय करायचं? – रामदास आठवले
ओबीसी आरक्षणात वाटेकरी स्वीकारणार नाही; आरक्षणाला धक्का लावाल तर रस्त्यावर उतरू: देवेंद्र फडणवीस
(why bjp plays obc card?, read political expert comment)