Explain : राज ठाकरेंच्या मनसेची मुंबईत अशी हालत का झाली? काय कारणं आहेत?

| Updated on: Nov 25, 2024 | 12:55 PM

Explain : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे निकाल जाहीर झाले आहेत. कोणाचा पाय किती खोलात आहे, मतदाराला कोणावर किती विश्वास आहे, ते स्पष्ट झालय. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ठसठशीतपणे नजरेत भरतय ते मनसेच अपयश. मनसेचा एकही उमेदवार निवडून आला नाही, हे खराब आहेच. पण त्याहीपेक्षा या पक्षाची मान्यताच धोक्यात आहे.

Explain : राज ठाकरेंच्या मनसेची मुंबईत अशी हालत का झाली? काय कारणं आहेत?
raj thackeray
Follow us on

दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. सगळं चित्र स्पष्ट झालं आहे. कोणाचा पाय किती खोलात आहे, मतदारराजाला कोणावर जास्त विश्वास आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळाली आहेत. साडेसात वर्षांच्या सत्ताकाळामुळे प्रस्थापित महायुती सरकारविरोधी लाट अपेक्षित होती. पण उलट घडलं. राज्यातील जनतेने महायुतीच्या पारड्यात भरभरुन मत टाकली. मागच्या दोन इलेक्शनपेक्षा 2024 विधानसभा निवडणुकीत महायुतीने सर्वाधिक जागा जिंकल्या. भाजपने एकट्याने स्वबळावर 130 पेक्षा जास्त जागा जिंकल्या. यामध्ये लाडकी बहिण असेल किंवा अन्य कल्याणकारी योजनांच योगदान असेल, पण विरोधकांचा साफ धुव्वा उडाला. विरोधी पक्षांना विरोधी पक्षनेतेपद मिळवण्याइतपतही जागा जिंकता आलेल्या नाहीत. म्हणजे विरोधक आपल्याबद्दल जनतेच्या मनात साधा विश्वासही निर्माण करु शकले नाहीत, असा हा कौल सांगतो. महाविकास आघाडी अपयशी ठरली, पण या सगळ्यात ठसठशीतपणे नजरेत भरलं, ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अपयश.

23 नोव्हेंबर 2024 रोजी निकाल जाहीर झाले. 22 नोव्हेंबरच्या संध्याकाळपर्यंत अनेक मनसैनिकांना आणि या पक्षाच्या पाठिराख्यांना मनसे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करेल, अशी अपेक्षा होती. पण, 2014 आणि 2019 या दोन विधानसभा निवडणुकीपेक्षाही मोठ अपयश यंदाच्या निवडणुकीत मनसेच्या पदरात पडलं. त्या दोन निवडणुकीत शरद सोनवणे आणि राजू पाटील यांच्या रुपाने मनसेचा एकमेव आमदार निवडून आला होता. 2024 च्या यंदाच्या विधानसभा निवडणुकीत तर मनसेला खातही उघडता आलेलं नाहीय. त्यापेक्षाही गंभीर बाब म्हणजे मनसे पक्षाने इतकी सुमार कामगिरी केलीय की, मनसेच रेल्वे इंजिन चिन्ह सोडा, पण पक्ष म्हणून त्यांची मान्यता रद्द होऊ शकते, अशी स्थिती आहे. याला कारण आहे या निवडणुकीत मनसेला मिळालेली केवळ 1.8 टक्के मतं. मनसेने यंदाच्या निवडणुकीत 125 जागा लढवल्या होत्या. जागा जिंकण सोडा, पण मनसेला लोकांची मत सुद्धा मिळवता आलेली नाही, हे विदारक सत्य आहे.

2014, 2019 मध्ये मनसेला किती टक्के मत मिळालेली?

2009 च्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे सर्वाधिक 13 आमदार निवडून आले होते. त्यावेळी त्यांना 5.78 टक्के मत मिळाली होती. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत 3.15 टक्के आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत 2.25 टक्के. तेच यंदाच्या निवडणुकीत 1.8 टक्के मतं. मागच्या दोन निवडणुकीत मोदी फॅक्टर गृहीत धरु, त्यामुळे मनसेची कामगिरी खराब झाली. पण यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अशी स्थिती नव्हती. यंदा मनसेला अनुकूल वातावरण दिसतं होतं. सोशल मीडियावर मनसेला पाठिंबा दिसत होता.

वरातीला नाचायला सगळे पण…

राज ठाकरेंनी राज्यभरात 49 प्रचारसभा घेतल्या. पूर्ण ताकदीने निवडणूक लढवली. राज ठाकरेंच्या सर्व सभांना गर्दी झाली, त्यांनी प्रचारात मांडलेल्या मुद्यांवर लोकांमध्ये भरपूर चर्चा झाली. कार्यालयीन किंवा चहाच्या टपरीवर रंगणाऱ्या गप्पांमध्ये मनसे आणि राज ठाकरेंचे मुद्दे किती योग्य आहेत, या बद्दल भरभरुन बोललं गेलं. पण प्रत्यक्षात वरातीला नाचायला सगळे पण लग्नाच्या मांडवात अक्षता टाकताना कोणी नाही, अशी मनसेची स्थिती झाली.

एकनाथ शिंदे मागून येऊन पुढे निघून गेले

मुंबईत फक्त शिवडी विधानसभा मतदारसंघातून बाळा नांदगावकर यांनी 67 हजार मतं मिळवली. ते दुसऱ्या स्थानावर राहिले. माहीमसह मुंबईतील अन्य मतदारसंघात मनसेचे सर्वच उमेदवार तिसऱ्या स्थानावर फेकले गेले. 2009 च्या लोकसभा निवडणुकीनंतर मनसेवर मत विभाजनाचा फटका बसला होता. मनसेमुळे शिवसेना-भाजपचे उमेदवार पडले होते. पण आता तो शिक्का बसावा, इतकी सुद्धा लक्षणीय मत मिळवता आलेली नाहीत. उलट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मुंबईत फारसा प्रभाव नसताना सहाआमदार निवडून आणले. खरच याचा मनसेच्या नेतृत्वाने विचार केला पाहिजे.

राज ठाकरेंची चूक काय?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नेहमी चर्चेत असतात. त्यांच्या भाषणांना, विचारांना मीडियामधून भरपूर प्रसिद्धी मिळते. त्यांचा चाहतावर्ग सुद्धा भरपूर आहे. पण प्रत्यक्ष जमिनीवर मनसेचे कार्यकर्ते लोकांपर्यंत पोहोचत नाही. शिवसैनिकांवर मतदारांचा जो विश्वास आहे, तशा विश्वास अजून मनसैनिकांना कमावता आलेला नाही. मनसे अध्यक्षांची सतत बदलणारी भूमिका हे सुद्धा विश्वास गमावण्यामागच एक कारण आहे. पक्ष स्थापनेनंतर विकास, त्यानंतर मराठीचा मुद्दा आता हिंदुत्व. म्हणजे खूप कमी काळात पक्षाची भूमिका बदलत गेली आहे. मनसे वाढत नाही, या प्रश्नावर राज ठाकरे म्हणतात, शिवसेनेला स्थापना झाल्यानंतर सत्तेत पोहोचायला बरीच वर्ष लागली. पण या काळात शिवसेना वाढत होती. या उलट 2009 ला मनसेचे एकाचवेळी 13 आमदार निवडून आले. 2012 ला नगरसेवक सुद्धा चांगल्या संख्येने निवडून आले. पण त्यानंतर मनसेला उतरती कळा लागली, ती अजूनही कायम आहे.