मुंबई: शिवसेनेच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांनी शिंदे गटात(eknath shinde) प्रवेश केला आहे. आठ दिवसांपूर्वीच म्हात्रे यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली होती. त्यामुळे शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी त्यांना वाघिण म्हणून संबोधले होते. पण अवघ्या आठ दिवसातच राऊतांच्या या वाघिणीने पलटी मारली आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शिंदे गटाला रस्त्यावर उतरून फटके देण्याची भाषा करणाऱ्या म्हात्रे यांनी शिंदे गटातच प्रवेश केल्याने अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत. शीतल म्हात्रे यांचा येत्या महापालिका निवडणुकीत विजय होणं अशक्य आहे. त्यामुळेच शिंदे गटात जाऊन भाजपचं पाठबळ घेऊन महापालिकेत पोहोचण्याचा शीतल म्हात्रे यांचा इरादा असून त्यासाठीच त्यांनी पक्षांतर केल्याचं सांगितलं जात आहे. तर, ईडी आणि पोलिसांच्या कारवाईमुळेच त्यांनी पक्षांतर केल्याचीही दबक्या आवाजात चर्चा आहे.
शीतल म्हात्रे यांनी काल शिंदे गटात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन आपल्या शेकडो समर्थकांसह त्यांनी शिंदे गटात रितसर प्रवेश केला. शिवसेनेत घुसमट होत असून महापालिकेतील शिवसेना मुठभर लोकांच्या हातात गेल्याचं कारण देत म्हात्रे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिंदे गटात जाणाऱ्या मुंबई महापालिकेतील त्या पहिल्या नगरसेविका आहेत. आतापर्यंत मुंबईतून केवळ आमदारांनीच शिंदे गटात प्रवेश केला होता.
शीतल म्हात्रे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने त्यावर उलटसुलट चर्चा होत आहेत. शीतल म्हात्रे या ईडीच्या भीतीने शिंदे गटात आल्याचं बोललं जात आहे. तसेच शिंदे यांच्यावर गंभीर गुन्हा दाखल असल्याने पोलिसांच्या अटकेच्या भीतीने त्यांनी शिवसेना सोडल्याचंही सांगितलं जात आहे.
शीतल म्हात्रे आणि त्यांच्या कार्यकर्त्यावर एका तरुणाला बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. एका 22 वर्षीय तरुणाला म्हात्रे यांच्या कार्यकर्त्यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती. त्यामुळे 8 जुलै रोजी म्हात्रे यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला होता. एमएचबी कॉलनी पोलीस ठाण्यात हा मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे त्यांना कधीही अटक होऊ शकते, असं सांगितलं जात होतं. त्यामुळेच त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याचं सांगितलं जात आहे.
म्हात्रे यांचा शिवसेनेचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्याशी वाद झाला होता. घोसाळकर यांनी छळ केल्याचा त्यांनी आरोप केला होता. घोसाळकर यांच्यामुळे माझ्या जीवाला धोका आहे. त्यांच्याकडून आमची वारंवार मुस्कटदाबी केली जात आहे. त्या व्यक्तिच्या हाताखाली काम करेल अशी माझी मनस्थिती आहे असं मला वाटत नाही. उद्धवजींच्या शब्दाला मान देऊन थांबले. पण किती दिवस पक्षात थांबेल नाहीत नाही. मी घोसाळकरांच्या हाताखाली काम करू शकत नाही. उद्या माझं काही बरं वाईट झालं तर त्याचा दोष घोसाळकरांनाच जाईल. उद्या मी बाहेर पडले तर ते माझ्यावर हल्ला करू शकतात. मी हल्ला नाही केला असंही ते म्हणू शकतात. त्यांच्याकडे विभागप्रमुखपद आहे. त्याचा ते गैरवापर करू शकतात. त्यांचं विभागप्रमुखपद काढून घ्यावं अशी आमची मागणी आहे, असं शीतल म्हात्रे यांनी त्यावेळी म्हटलं होतं.